कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्याकडून काल, शुक्रवारी रात्री छापा टाकण्यात आला. यावेळी प्रकल्पाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दोनच दिवसापुर्वी कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी काँग्रेसचे नूतन खासदार शाहू छत्रपती व जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे मुदाळ गावात जोरदार स्वागत केले होते. त्यानंतर लगेचच राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी दारात आल्याने या कारवाईला राजकीय वास आहे का? याची चर्चा ‘बिद्री’ परिसरात सुरु झाली आहे. बिद्री साखर कारखान्याचे प्रतिदिन साठ हजार केएलपीडी क्षमतेच्या डिस्टलरी प्रकल्पाची उभारण्याचे काम सुरु आहे. सुरवातीपासूनच १३० कोटी रुपयांचा हा प्रकल्प सत्ताधारी व विरोधी गटाच्या आरोप-प्रत्यारोपांनी चर्चेत आहे. प्रकल्पाचे इरादापत्र, अन्य परवानग्या व कर्ज यांमुळे नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणूकीतही हा मुद्दा गाजला होता. या निवडणूकीत के. पी. पाटील यांनी एकहाती सत्ता कायम राखत विरोधकांना चारीमुंड्या चित केले होते.
लोकसभा निवडणूकीत के. पी. पाटील हे महायुती आघाडीच्या सोबतच होते. पण ‘राधानगरी’ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलीक यांना मताधिक्य मिळाले नाही. त्यातच खासदार शाहू छत्रपती व सतेज पाटील यांचे कमानी घालून स्वागत केल्याने के. पी. पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार याची चर्चा सुरु होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘बिद्री’ कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाईला राजकीय वास आहे का? याची चर्चा सध्या सुरु आहे.
शुक्रवारी रात्रभर तपासणी..डिस्टलरी प्रकल्पाबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह संबधित अधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला सविस्तर माहीती दिली. शुक्रवारी रात्रभर तपासणी झाल्यानंतर शनिवारी सकाळी आठ वाजता पथक गेले.
प्रकल्पातील त्रुटीची चौकशी?डिस्टलरी प्रकल्पाबाबत विरोधकांनी रान उठवले होते. प्रकल्पात काही त्रुटी असल्याचा आरोप त्यांचा होता. त्या अनुषंगानेच चौकशी झाल्याचे समजते.
कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन त्याची उत्पादन चाचणी सुरु आहे. पण काल उत्पादन शुल्कच्या पथकाने प्रकल्पाला अचानक भेट देऊन तपासणी केली. याचा अहवाल ते आपल्या वरिष्ठांना देतील. हा अहवाल आपल्याला मिळाल्यानंतर त्याबाबत योग्य तो खुलासा करण्यास कारखाना प्रशासन सक्षम आहे. - के. पी. पाटील, अध्यक्ष बिद्री साखर कारखाना.