कोल्हापूर : राज्यात ३११० तलाठी सजे व ५१८ मंडल अधिकारी नियुक्त करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. बुधवारी त्यासंबंधीचा शासनादेश महसूल विभागाने काढला. महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाने २०१४ मध्ये नवीन तलाठी सजे व मंडल अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली होती. ती प्रत्यक्षात येण्यासाठी आठ वर्षे गेली. म्हणजेच सरकारी काम आणि सहा महिने थांब हा अनुभव खुद्द तलाठ्यांनाही आला. नाशिक महसूल विभागात सर्वाधिक ६८९ सज्जा आणि ११५ मंडळे स्थापन होणार आहेत.वाड्यांची गावे होतात, त्यातून नव्याने ग्रामपंचायती होतात. त्यामुळे तलाठ्यांच्या गरज निर्माण होते. महसूल मंडळामध्ये पाच ते आठ सजे समाविष्ट असतात. सरासरी वीस गावे एका महसुली मंडलात म्हणजेच एकाच मंडल अधिकाऱ्याकडे येतात. एकाच तलाठी व मंडल अधिकाऱ्याकडील कामाचा भार जास्त आहे. हल्ली प्रत्येक शासकीय योजनेला सात-बारा उताऱ्यापासून अनेक सरकारी कागदपत्रांची जंत्री जोडावी लागते. त्यामुळे हे उतारे मिळण्यासाठी लोकांची त्रेधातिरपीट उडते. तलाठी महासंघाने २०१४ मध्ये मागणी केल्यावर शसानाने त्यासाठी नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्याचा अहवाल दोन वर्षांनी २०१६ मध्ये आला. या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली. या उपसमितीने २०१७ मध्ये अहवाल दिला. त्याचवेळी मंजूर करण्यात आलेल्या पदांचा शासनादेश ७ डिसेंबर २०२२ ला निघाला.
महसुली गावनिहाय तलाठी सजे निर्माण करण्याचा शासनाचा निर्णय चांगलाच आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या त्यांच्या गावांत तलाठी भेटतील. त्यांची कामे होतील. - धनाजी कलिकते, कोल्हापूर जिल्हा तलाठी महासंघाचे नेते.
महसुली विभागानुसार मंजूर सजे व महसुली मंडलेपुणे - ६०२ : १००अमरावती - १०६ : १८नागपूर - ४७८ : ८०औरंगाबाद - ६८५ : ११४नाशिक - ६८९ : ११५कोंकण - ५५० : ९१
पुणे महसूल विभागपुणे - ३३१ : ५५सोलापूर - १११ : १९सातारा - ७७ : १२सांगली - ५२ : ०९कोल्हापूर - ३१ : ०५