कोल्हापूर : पोलीस भरतीसाठी आता पहिल्यांदा शारीरिक चाचणी घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय चांगला आहे. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या चाचणी आणि रिक्त पद भरतीच्या निर्णयाचे कोल्हापुरातील विद्यार्थी, मार्गदर्शकांनी स्वागत केले.
सुमारे ४० हजार जण तयारी करतात
कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस भरतीची तयारी सुमारे ४० हजार विद्यार्थी करतात. त्यात अधिकतर विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. आरक्षणाची सवलत असल्याने तयारी करणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ५० टक्के आहे.
मार्गदर्शक सांगतात?
आतापर्यंत लेखी परीक्षा आधी आणि नंतर शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्वजण लेखी परीक्षा द्यायचे. मात्र, त्यातील अनेकजण शारीरिक चाचणीत अपात्र ठरायचे. या प्रक्रियेत शासनाचा वेळ जायचा. आता त्याची बचत होणार आहे. शारीरिक चाचणी आधी घेण्याचा निर्णय चांगला आहे. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. - जॉर्ज क्रूझ, कोल्हापूर.
शारीरिक चाचणी की लेखा परीक्षा आधी याबाबतचा हजारो विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम आता दूर झाला आहे. या चाचणी निर्णयामुळे ‘फिट आणि हिट’ पोलीस कर्मचारी मिळणार आहेत. रिक्त पद भरतीबाबतचा समाधानकारक निर्णय शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांनी आता तयारीला लागावे. - अभय पाटील, कोल्हापूर.
विद्यार्थी म्हणतात?
लेखी परीक्षेपूर्वी शारीरिक चाचणी घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याचा माझ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. - सुमित महाडिक, इचलकरंजी
शारीरिक चाचणी आधी घेण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे आम्हा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. चांगला फायदा होणार आहे. शासनाने आता ही चाचणी ५० ऐवजी १०० गुणांची करावी. - संदीप पाटील, मौजे तासगाव