कोल्हापूर : चाफोडी (ता. करवीर) येथील अतुल दिलीप कांबळे (वय २६) याने घेतलेल्या दुचाकीचे हप्ते थकल्याचे सांगून तोतया वसुली अधिका-यांनी दुचाकी लंपास केली. हा प्रकार जूनच्या पहिल्या आठवड्यात घडला. बँकेत जाऊन दुचाकीची चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला. बँकेचे ओळखपत्र घालून दुचाकी घेऊन गेलेले वसुली अधिकारी प्रत्यक्षात बँकेच्या वसुली पथकातील नसल्याचे समोर आल्याने कर्जदारासह बँकेचे अधिकारीही चक्रावले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, चाफोडी येथील अतुल कांबळे याने २०१७ मध्ये नवीन दुचाकीची खरेदी केली. त्यासाठी एका बँकेचे कर्ज घेतले होते. चार हप्ते थकल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात चार अधिकारी दारात आले. त्यांच्या गळ्यात बँकेचे ओळखपत्र होते. 'तुमचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे दुचाकी जप्तीसाठी आम्ही आलो आहे. दुचाकीची चावी द्या,' असे सांगून दुचाकी ताब्यात घेऊन ते निघून गेले. बँकेच्या वसुली पथकाने दुचाकी ताब्यात घेतल्याची माहिती अतुल याने बँकेच्या अधिका-यांना दिली. प्रत्यक्षात मात्र वसुली पथकाने जप्त केलेल्या वाहनांमध्ये अतुल याची दुचाकी आढळली नाही. बँकेच्या वसुली पथकाने त्याची दुचाकी आणलीच नसल्याची माहिती अधिका-यांनी दिली. त्यामुळे तोतया वसुली पथकाने दुचाकी लंपास केल्याची फिर्याद अतुल कांबळे याने करवीर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी अनोळखी चौघांवर गुन्हा दाखल केला.
हप्ते थकल्याचे सांगून दुचाकी नेली, बँकेत जाऊन चौकशी केली अन्.., कोल्हापुरातील घटना
By उद्धव गोडसे | Published: July 06, 2023 3:51 PM