पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडाला गेल्या काही दिवसापासून घरघर लागली आहे. काही दिवसापुर्वीच बुरुजाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. यातच पावसाच्या संततधारेमुळे आज पुन्हा एकदा चार दरवाजाच्या खाली नाक्याजवळ ज्या ठिकाणी गेल्यावर्षी रस्ता खचला होता त्याच ठिकाणी पुन्हा दगड ढासळू लागले आहेत. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याला धोका निर्माण झाला आहे.मागील पावसात पन्हाळगडावर जाणारा मुख्य मार्ग खचला होता. त्यामुळे अनेक महिने या मार्गावरील वाहतूक बंद होती. यानंतर नव्याने रस्ता करण्यात आला. याच बांधकामाजवळ आता दगड निखळून पडत आहेत. आज, सोमवारी सकाळी साडे आठच्या सुमारास चार दरवाजाच्या खाली नाक्याजवळ एकेक दगड निसटतानाचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा धोका उद्धभवण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा गडकिल्ल्यांच्या संवर्धनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यात कोल्हापुरातील पन्हाळगडाचा देखील समावेश आहे. गेल्या काही दिवसापुर्वी गडावरील बुरुज ढासळल्याने गडास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आवाज देखील उठवला होता. मात्र, अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
कोल्हापूर: ऐतिहासिक पन्हाळगडाची पडझड सुरुच, पुन्हा ढासळू लागले दगड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 1:30 PM