कोल्हापूर : तंत्रज्ञानाच्या जोरावर कोल्हापूरकर सातासमुद्रापार जाऊन पोहोचले आहेत. याची प्रचिती शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या जेम्स कॅमेरून यांच्या महत्त्वाकांक्षी ‘अवतार-२’ या हॉलिवूडपटामुळे आली आहे. या चित्रपटाची तांत्रिक बाजू कोल्हापूरच्या युवकांनी सांभाळली आहे. व्हीएफएक्स आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून स्पेशल इफेक्ट्स देत या युवकांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. ‘बाहुबली’ चित्रपटातून सर्वांनाच व्हीएफएक्स आणि त्यातील व्हिज्युअल ग्राफिक्स या तंत्रज्ञानाची भुरळ घातली आहे. वेगवेगळे ग्राफिक्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे नुकत्याच येऊन गेलेल्या आरआरआर या सिनेमाला एका उंचीवर नेले आहे. या भारतीय चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्सना हॉलिवूडच्या तंत्रज्ञांनी मागे सारले आहे; परंतु या इफेक्टवर काम करणारे बरेच तंत्रज्ञ भारतीयही आहेत. विशेषत: कोल्हापुरातील तंत्रज्ञांचा यात हातभार लागला आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल; परंतु शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या हॉलिवूडच्या ‘अवतार-२’ची बरीचशी तांत्रिक बाजू कोल्हापूरकरांनी सांभाळली आहे. यामध्ये शिवतेज पाटील, संदेश दाभाडे, प्रथमेश वसरगावकर, राहुल कांबळे, रणजित पाटील, दत्ता पाटील, सुधीर पाटील, सुनील सुतार, किरण भूपती या कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी बजावली. त्यांना कोल्हापुरातील की-फ्रेम स्टुडिओचे वासीम मुल्लाणी, मधुर चांदणे आणि विशाल गुडूळकर यांचे मार्गदर्शन मिळाले. या सर्वांनी ‘अवतार-२’ हॉलिवूडपटासाठी रोटो आर्टिस्ट व अन्य काही विभागांमध्ये कामाची धुरा सांभाळली होती आणि ती यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवली आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ॲनिमेशन माध्यमातून अनेक हिंदी-मराठी, तेलुगू-तमिळ, मालिका आणि जाहिरातींसाठी काम केल्यानंतर मोठ्या पडद्यावरील भव्यदिव्य असा हॉलिवूड सिनेमा करायचा योग आला. यापूर्वी ब्रह्मास्त्र सिनेमातील ‘डान्स का भूत’ हे संपूर्ण गाणे, बॉइज ३ मधील अनेक दृश्यांना या स्टुडिओमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स देण्यात आले आहेत. कोल्हापुरातही मिळणार नव्या संधीबंगळुरू, हैदराबाद, मुंबई, पुणे यासोबतच कोल्हापुरातही प्रख्यात आणि नावाजलेल्या संस्था, स्टुडिओसाठी काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कोल्हापुरातील स्टुडिओत अनेक चित्रपटांचा आणि मालिकांमधील कामाचा अनुभव मिळतो आहे.
‘अवतार-२’च्या तांत्रिक बाजूवर कोल्हापूरचा ठसा, व्हीएफएक्स, ग्राफिक्समधून दिले स्पेशल इफेक्ट्स
By संदीप आडनाईक | Published: December 19, 2022 11:31 AM