कोल्हापूर/आजरा - जिल्ह्यातील आजरा-आंबोली रस्त्यावर मसोलीजवळील आवडे वसाहतीजवळ आज पहाटे बर्निंग कारचा थरार नागरिकांनी अनुभवला. गोव्यावरून जालन्याला कॅन्सरवरील औषध घेऊन जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. त्यामध्ये, रस्त्यावरच गाडी जळून खाक झाली आहे. ही घटना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जालन्यातून रामप्रसाद नरहरी कावळे यांसह चौघेजण आपल्या एक्सयुव्ही- ५०० महिन्द्रा कंपनीच्या गाडीने कॅन्सरवरील औषध घेऊन गोव्याकडे गावी जात होते. ते मसोलीजवळील आवडी वसाहतीचे धोकादायक वळण पार करुन पुढे येताच गाडीतून धूर येत असल्याने गाडी थांबविली. त्यावेळी, अचानक इंजिनने पेट घेण्यास सुरुवात केल्याचं निदर्शनास आलं. गाडी पेटण्यास सुरुवात झाल्याने सर्वजण गाडीतून पटकन उतरले आणि रस्त्याशेजारील मातीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीत रस्त्याकडेला असणारे एक झाडही जळाले आहे. सुदैवाने, प्रसंगावधान ठेवत गाडीतून सर्वजण खाली उतरल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
बर्निंग कारचा थरार, गाडीसोबत रस्त्याशेजारील झाडही जळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 9:33 AM