कोल्हापूर : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. काँग्रेसने देशभरात कोरोना पसरवल्याचा गंभीर आरोप यावेळी पंतप्रधान मोदींनी केला. मोदींच्या या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध केला जात. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावादात आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी उडी घेतली आहे.'काँग्रेस आणि पंतप्रधानांनी एकत्र बसून लोकांना सत्य सांगावे' असा सल्ला भिडे गुरुजींनी दिला आहे. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना भिडे गुरुजींनी मोदी सरकार आणि काँग्रेसला हा सल्ला दिला आहे. नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणाऱ्या भिडे गुरुजींचा हा सल्ला मोदी सरकार व काँग्रेसला पचणी पडणार का हेच पाहावे लागणार आहे.यापूर्वी भिडे गुरुजींनी नागरिकांना कोरोना काळात मास्क वापरू नका, असा सल्लाच दिला होता, तसेच ज्या लोकांना कोरोना होतो ते नपुंसक असतात असेही वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यातच त्यांनी आता नव्या वादात उडी घेताना सावध प्रतिक्रिया देत सल्ला दिला आहे.दरम्यान, मोदींच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी काँग्रेसतर्फे भाजपच्या प्रत्येक कार्यालयासमोर 'माफी मांगो' आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. यावेळी पटोले म्हणाले की, पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती देशाची असते, त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान झाल्याने तीव्र दुःख झाल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानपदावर बसलेले व्यक्ती अजूनही भाजपची प्रचारक म्हणून वागत असल्याचे सांगत, भाजपने आणि पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली.
दोघांनी एकत्र बसून सत्य सांगावे, मोदींच्या वक्तव्यावर भिडे गुरुजींचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 11:41 AM