अनिल पाटीलसरुड : विज्ञान व तंत्रज्ञानाने जग २१ व्या शतकात प्रगतीकडे वाटचाल करत असताना अद्यापही समाजात अंधश्रध्देचे समूळ उच्चाटन झालेले दिसत नाही. निवडणुका आल्या की गावा-गावात भानामती प्रकार अचूनही समोर येतात. असाच काहीसा प्रकार शाहूवाडीतील वारणा रेठरे येथील सेवा संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आला आहे. या भानामतीच्या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.शाहूवाडीच्या माजी सभापती लतादेवी पाटील व माजी पंचायत समितीचे सदस्य जालींदर पाटील यांच्या राहत्या घरासमोर करणी व भानामतीचा प्रकार घडल्याचे आज, गुरुवार सकाळी उघडकीस आले. गावातील विठ्ठल विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीतुनच हा प्रकार घडल्याची परिसरात चर्चा रंगली आहे.वारणा रेठरे येथील विठ्ठल विकास सेवा संस्थेसाठी येत्या, शनिवार (दि.४) मतदान होणार आहे. या निवडणुकीत जालींदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे नवलाई भराडी विठ्ठलाईदेवी पॅनेल विरोधात जनसुराज्य - काँग्रेस युतीचे नवलाई भराडी विठ्ठलाईदेवी परिवर्तन पॅनेल अशा दोन आघाड्यांमध्ये चुरशीची लढत होत आहे.दरम्यान काल, बुधवारी मध्यरात्री जालींदर पाटील यांच्या घराशेजारी अज्ञातांनी करणी, भानामतीचा हा प्रकार केला आहे. यामध्ये बकर्याची प्रतिमा तयार करुन त्याला लाकडी पाय जोडले आहेत. या प्रतिमेच्या पाठीवर हिरव्या रंगाचे फडके टाकुन पाठीत लाकडी खुटी मारली आहे. तसेच त्याच्या गळ्यात हिरव्या बांगड्या अडकविल्या आहेत. या प्रतिमेवर हळद, कुंकु टाकून शेजारी अगरबत्ती, कापूर जाळण्यात आला आहे.भानामतीचा हा भयानक प्रकार आज, गुरुवारी सकाळी जालींदर पाटील यांच्या निदर्शनास आला. ही बातमी गावात पसरताच पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. सेवा संस्था निवडणुकीतुनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा गावात सुरु होती.
आमच्या सत्ताधारी पॅनेलचा पराभव व्हावा या हेतूनेच विकृत प्रवृत्तीच्या लोकांकडून हे कृत्य करण्यात आले आहे. सेवा संस्थेची निवडणूक ही लोकशाही मार्गाने होत असताना या निवडणूकीच्या तोंडावर अंधश्रध्देचा आधार घेऊन ग्रामस्थांच्या मध्ये भिती निर्माण करण्याचा हा प्रकार निषर्धाह आहे. - जालींदर पाटील - रेठरेकर माजी पं. स. सदस्य