विवेक स्वामीकबनूर : येथील डेक्कन रोडवरील मातंग समाज मंदिराशेजारी नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. या कचऱ्याचा उठाव वेळच्यावेळी होत नाही. त्यामुळे याठिकाणी दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. मातंग समाजाच्या वतीने वारंवार ग्रामपंचायतीस सूचना देऊनही हा कचरा हटवला जात नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी हा कचरा बँजोच्या-तालावर वाजत गाजत ग्रामपंचायत कार्यालयात आणून टाकला.कबनूरमध्ये घनकचरा टाकण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने गावातील घंटागाडी व कचरा उठाव बंद आहे. त्यामुळे नागरिक मिळेल त्या मोकळ्या जागेत कचरा आणून टाकतात. डेक्कन रोड परिसरामध्ये मातंग समाज मंदिर, प्रार्थना स्थळे, शाळा, दवाखाने आहेत. याच परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीगच्या ढीग पडले आहेत. हा कचरा कुजून दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.सामाजिक कार्यकर्ते कुंदन आवळे यांनी ग्रामपंचायतीकडे याप्रश्नी वारंवार पाठपुरावा केला होता. ग्रामपंचायतीकडून याप्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बँजो वाद्य वाजवत हा कचरा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणून टाकला. यावेळी ग्रामसेवक गणपत आदलिंग, सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील यांच्याबरोबर शाब्दिक वाद झाला. यावेळी अनिल गवरे, अनिल आवळे, दिलीप आवळे, राजू आवळे, तानाजी कांबळे, नितीन गवरे, राजू गवरे, ममता हेगडे, आक्काताई आवळे, लक्ष्मी हेगडे, रूक्मीणी कांबळे, शोभा गवरे, रेखा आवळे, लता आवळे, कांचन गवरे, यांच्यासह भागातील नागरिक सहभागी होते.
बँडबाजा वाजवत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयातच टाकला कचरा, कोल्हापुरातील कबनूरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 5:05 PM