कोल्हापूर/पन्हाळा - ऐतिहासिक पन्हाळ्यातील चार दरवजा जवळील नेबापुर कडे जाण्याच्या मार्गावरील ऐतिहासिक भिंत कोसळली. सलग दोन दिवस पावसाची संततधार कोसळत असल्याने चारदरवजाचे उर्वरीत अवशेषापैकी पायथ्याशी असणाऱ्या नेबापुर गावाकडे जाणाऱ्या पायवाटेवरील शिलहार भोज राजाच्या काळात बांधली गेलेली भिंत कोसळली. त्यामुळे, या भींतीजवळील झालेल्या भूसख्खलनाची दखल पुरातत्व विभागाने घ्यावी, अशी मागणी होत आहे.
कोसळलेल्या भींतीजवळच गतवर्षी मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाल्याने रस्ता खचला होता. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात भिंतीना तडे गेले आहेत, पुरातत्व विभागाने या ठिकाणाची पहाणी देखील केली होती. मात्र, निधी अभावी याची दुरुस्ती होवू शकली नाही. सलग पडणाऱ्या पावसाने पन्हाळ्याच्या तटबंदीचा व जीर्ण भिंतींचा दरवर्षी थोडा भाग कोसळत चालला आहे. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, गतवर्षी कोसळलेल्या रस्त्याच्या आदी असाच काही भाग कोसळला होता. त्याकडे वेळीच लक्ष दिले असते तर रस्त्याचे भुस्खलन झाले नसते. मात्र, आज पडलेल्या भागात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत याकडे पुरातत्व विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.