युद्धाच्या ठिणगीने स्टीलही महागले !, टनास किती रुपयांनी दर वाढला जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 12:35 PM2022-03-01T12:35:54+5:302022-03-01T12:36:51+5:30

बांधकाम तसेच ऑटोमाेबाइल इंडस्ट्रीवर होण्याची शक्यता

The war between Russia and Ukraine pushed up steel prices | युद्धाच्या ठिणगीने स्टीलही महागले !, टनास किती रुपयांनी दर वाढला जाणून घ्या

युद्धाच्या ठिणगीने स्टीलही महागले !, टनास किती रुपयांनी दर वाढला जाणून घ्या

Next

भारत चव्हाण

कोल्हापूर : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे परिणाम आपल्या देशातील बाजारपेठेवर जाणवत आहेत. या युद्धामुळे स्टीलही महागले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बांधकाम तसेच ऑटोमाेबाइल इंडस्ट्रीवर होण्याची शक्यता आहे. एक महिन्यापूर्वी ६५ हजार रुपये टन असणारा स्टीलचा दर आता ७० ते ७२ हजार रुपयांवर गेला आहे. आणखी काही दिवस युध्द सुरू राहिले तर आणखी दर वाढले जाण्याचा अंदाज स्टील बाजारातून व्यक्त केला जात आहे.

रशिया आणि युक्रेन देशात युध्द सुरू असले तरी त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जगातील सर्वच देशांवर होणार आहे. म्हणूनच सध्याच्या काळात युध्द कोणालाही परवडणारे नाही. दोन देशात युध्दाला सुरुवात होऊन आठ दिवस होत आल्यानंतर त्याचे परिणाम बाजारपेठेवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बांधकाम, औद्योगिक व्यवसायाला लागणाऱ्या स्टील उद्योगाला युध्दाचा फटका बसला आहे.

दोन वर्षांत दर ६५ टक्क्यांनी वाढले

महिन्यापूर्वी ६५ हजार रुपये टन स्टीलचा दर होता. तो आता ७० ते ७२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. २०२० मध्ये स्टीलचा दर ४२ ते ४५ हजार रुपये टन होता. कोरोनामुळे स्टील उद्योगावर परिणाम झाला आणि दर ६५ हजार रुपयापर्यंत पोहोचला. म्हणजे गेल्या दोन वर्षांत स्टीलचे दर ६५ टक्क्यांनी वाढले आहेत.

कशामुळे झाली वाढ?

स्टीलसाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने युरोपीय देशातून आयात केला जातो. युध्द सुरू होण्याच्या आधीपासून तिकडून येणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा कमी झाला आहे. त्याचा फटका भारतीय स्टील उद्योगाला बसला आहे. तसेच क्रुड ऑईलचे दर वाढत असल्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार आहेत. त्यामुळेच स्टीलची दरवाढ होत आहे. युध्द लवकर थांबले नाही तर आणखी दर वाढण्याची शक्यता आहे.

दरवाढीचा परिणाम कशावर होणार?

स्टीलमधील दरवाढीचा परिणाम बांधकाम, औद्योगिक व्यवसायावर होणार आहे. तसेच स्टीलचा कमी अधिक प्रमाणात वापर होत असलेल्या अन्य छोट्या-मोठ्या उद्योगावर सुध्दा परिणाम होणार आहे. बांधकाम व्यवसायात मंदी येण्याची शक्यता आहे. स्टीलचे दर उतरेपर्यंत बांधकामे बंद ठेवली जाण्याची शक्यता आहे.


वाढलेल्या दरांमुळे बांधकाम व्यावसायिकांचे आर्थिक गणित बदलणार आहे. त्यामुळे गृहप्रकल्पाची कामे रोखली जाण्याची शक्यता आहे. स्टीलची मागणी घटणार आहे. -शीतल चौगुले, कोल्हापूर.


भारतीय स्टील उद्योगाला लागणारा कच्चा माल कमी पडणार नाही तसेच डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, याची खबरदारी केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे. थोडक्यात दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. -रोहन मुधाळे, कोल्हापूर

Web Title: The war between Russia and Ukraine pushed up steel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.