काेल्हापूर : जून महिना निम्मा होत आला तरी अद्याप मान्सून सक्रिय होत नाही, जिल्ह्यातील प्रमुख धरणांनी तळ गाठल्याने नागरिकांच्या हृदयाचा ठोका चुकत आहे. काळम्मावाडी व राधानगरी धरणात अत्यल्प पाणीसाठा असून आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
यंदा, तुलनेत वळीव पाऊसही कमी झाल्याने शेतीसाठी पाणी उपसा मोठ्या प्रमाणात करावा लागला. एप्रिल व मे या दोन महिन्यात साधारणत: सहा -सात जोरदार वळीव पाऊस कोसळतात. त्यामुळे पिकांसह खरीप पेरणीसाठी पोषक ठरते. यंदा मात्र, जेमतेम तीन-चार पाऊस झाले तेही सगळीकडे झालेच नाहीत. त्यात उष्णतेची लाट पसरल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन जलाशयातील पाणीसाठा कमी झाला.जून निम्मा झाला तरी अद्याप मान्सून सक्रिय झालेला नसल्याने चिंता वाढली आहे. त्यात जिल्ह्यात प्रमुख ‘काळम्मावाडी’, ‘राधानगरी’ धरणांनी तळ गाठला आहे. राधानगरी धरणात केवळ १.८४ टीएमसी तर काळम्मावाडीत १.६७ टीएमसी पाणीसाठा आहे. इतर छोट्या छोट्या धरणांनीही तळ गाठल्याने आठवड्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.मान्सून दोन-तीन दिवसात सक्रिय झाला तरी जलाशयात पाणीसाठा वाढण्यासाठी पंधरा दिवस लागतात. त्यामुळे पुढचे पंधरा दिवस जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.
पाण्याचे नियोजन चुकलेशाहूवाडी तालुक्यातील कडवी धरणात प्रत्येक वर्षी सरासरी ४० टक्के पाणीसाठा जूनपर्यंत असतो. यंदा मात्र तो ३० टक्क्यापर्यंत आला. काळम्मावाडी धरण मोकळे करण्याची घाई कोणाला झाली होती, हेच कळत नाही. एकूणच धरणातील पाण्याचे नियोजन यंदा काहीसे चुकले हे मात्र निश्चित आहे.
हवामान विभागाच्या अंदाजामुळे संभ्रमदेशातील विविध हवामान संस्थांकडून यंदाच्या मान्सूनबाबत अंदाज वर्तवले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय होईल, असे सांगितले होते; मात्र दुसरा आठवडा संपला तरी अजून आकाश पांढरे शुभ्रच आहे.धरणातील तुलनात्मक पाणी साठा टीएमसीमध्ये -
धरण | १२ जून २०२२ | १२ जून २०२३ |
राधानगरी | २.४२ | १.८४ |
तुळशी | १.५७ | १.०४ |
वारणा | ११.०३ | ११.७६ |
काळम्मावाडी | ६.८० | १.६७ |
कासारी | ०.६१ | ०.५४ |
कडवी | ०.८१ | ०.७८ |
कुंभी | १.०४ | ०.९५ |
पाटगाव | १.१७ | ०.८४ |
चिकोत्रा | ०.७६ | ०.४६ |
चित्री | ०.६८ | ०.३४ |
घटप्रभा | ०.०२ | ०.६३ |
आंबेओहोळ | ०.६३ | ०.४३ |