कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उसंत दिल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असली तरी अद्याप २८ बंधारे पाण्याखाली आहेत. दोन राज्ये तर तीन प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद राहिल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. शुक्रवारी सकाळी ऊन पडले होते. त्यानंतर ११ वाजता जोरदार सरी कोसळल्या, पण दिवसभर उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट होत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता पंचगंगा नदीचे पाणी २६ फुटांवर होते, ते सायंकाळी ५ वाजता २५ फुटापर्यंत खाली आले होते.शुक्रवारपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी प्रत्यक्षात पाऊस झालाच नाही. जिल्ह्यात भात व नागलीच्या रोप लागणीच्या कामाला गती आली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १ लाख ७६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जांबरे धरण भरले..चंदगड तालुक्यात घटप्रभा पाठोपाठ जांबरे धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाची क्षमता ०.८२० टीएमसी आहे.