संदीप बावचेजयसिंगपूर : यंदा कमी झालेला पाऊस आणि कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजजवळ कमी झालेली पाणीपातळी यामुळे शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर चार वर्षांनंतर फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावर बरगे घालण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून तयारी सुरु झाली आहे.हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे मार्च, एप्रिलपर्यंत राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्याची गरज भासत नव्हती. उन्हाचा तडाखा सुरु झाला आहे. त्यातच कोयना धरणात देखील पाण्याचा कमी साठा आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कृष्णा नदीची पाणीपातळी वारंवार कमी होत आहे.राजापूर बंधारा जवळपासून ४० हून अधिक गावांना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला आहे. पावसाळ्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्यानंतर पूरसदृश स्थिती निर्माण होते. पावसाची संततधार आणि धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला की कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याची मागणी होते. पाण्याचा विसर्ग सुरु झाला की शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नदीची पाणीपातळी ओसरायला सुरुवात होते. मात्र कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजच्या बॅकवॉटरमुळे गेल्या चार वर्षापासून तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर बरग्याविना १३ फुटहून अधिक पाणी पातळी मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत पाहायला मिळत होती. त्यामुळे या बॅकवॉटरच्या परिस्थितीवरुन तज्ज्ञ समिती नेमून अभ्यासाची गरज असल्याची चर्चा झाली होती. राजापूरपासून ९० किलोमीटर असणाऱ्या हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे पाण्याचा समतोल पहायला मिळत होता. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीपातळी खालावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.बरगे घालणार..
- मात्र गेल्या चार वर्षांनंतर कर्नाटकातील हिप्परगीचा बॅकवॉटर कमी झाल्यामुळे राजापूर बंधाऱ्यावर फेब्रुवारी महिन्यातच पाणीपातळी खालावली आहे.
- शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्यासाठी तयारी सुरु केली आहे.