प्रकाश पाटील
कोपार्डे : कुंभी नदीतील पाण्याला काळपट, तांबूस रंग आला आहे. याच नदीतून काठावरील ११ गावांतील ग्रामस्थांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजना असल्याने हे पाणी पिण्यासाठी वापरल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
कुंभी नदीवर सांगरूळ-कुडित्रे दरम्यान असलेल्या सांगरूळ धरण संस्थेचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला नोव्हेंबरमध्ये पाणी अडवण्यासाठी बरगे घालण्यात आले आहेत. यामुळे पाणी प्रवाहित होत नाही. याशिवाय वळवाचापाऊस पडत असल्याने पावसाचे पाणी ओढ्यानाल्याने थेट नदीला मिळत आहे. यातून वाहत जाणारे गावागावांतील सांडपाणी थेट नदीला मिसळत आहे.
पावसाच्या हजेरीने शेतीपंप बंद असल्याने नदीच्या पाण्याचा उपसा होत नाही. बंधाऱ्यातील पाणी प्रवाहित करण्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष देऊन नागरिकांना याबाबत पाणी उकळून पिण्यासाठी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा साथीच्या आजारांना सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाणी फिल्टरची योजना नाही
ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांना फिल्टर नाही. अनेक ग्रामपंचायती नदीतून पाणी उपसा करून ते पाण्याच्या टाकीत टाकतात व पाणी फिल्टर करण्याची योजना नसल्याने थेट आहे तसा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे अशुद्ध पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असून यातून साथीचे रोग पसरत आहेत.
पावडर वापरण्याचे ज्ञान नाही
पाण्याचे प्रदूषित प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामपंचायती टी सेल पावडरीचा हमखास वापर करतात; पण ती वापरण्याचे ज्ञान, कौशल्य कर्मचाऱ्यांना नसल्याने प्रमाणापेक्षा जास्त पावडरीचा वापर होतो. टी सेल पावडरीच्या अतिवापराने आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांगरूळ बंधाऱ्यात अडविण्यात आलेले पाणी वाहते करण्यासाठी आरोग्य विभागाने सूचना कराव्यात; अन्यथा साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. - भगवान देसाई, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, भामटे
कारणे शोधण्याचे शासकीय पातळीवर कोणतेच प्रयत्न होत नाहीत. गेल्या चार-आठ दिवसांपासून नदीतील अशुद्ध पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या पातळीवर याबाबत खबरदारी घ्यावी. - दिनेश पाटील, कोपार्डे ग्रामस्थ