कोल्हापूर : संचालक मंडळाची मुदत संपलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिले. त्यामुळे जिल्ह्यातील ‘कोल्हापूर’, ‘गडहिंग्लज’ व ‘जयसिंगपूर’ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका गेली सव्वादोन वर्षे विविध कारणाने लांबणीवर टाकल्या होत्या. ऑक्टोबर महिन्यात सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार प्रारूप व अंतिम याद्या झाल्या होत्या. मात्र, तोपर्यंत राज्यातील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने ही प्रक्रिया थांबवली होती. त्यातच ग्रामपंचायतींच्या नवीन सदस्यांचा समावेश मतदार यादीत करण्याबाबत याचिका दाखल झाल्या होत्या. राज्यातील विविध न्यायालयांतील याचिका एकत्रित करत नागपूर खंडपीठाकडे सुनावणीसाठी दिल्या होत्या. गुरुवारी त्यावर सुनावणी होऊन ३० एप्रिलपर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ‘कोल्हापूर‘, ‘गडहिंग्लज’ व ‘जयसिंगपूर‘ बाजार समित्यांची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ग्रामपंचायत नवीन सदस्यांबाबत संभ्रमावस्थाग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या नवीन सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र, आजच्या आदेशात याबाबत स्पष्टता नसल्याने याबाबत संभ्रमावस्था आहे.
बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा, कोल्हापुरातील 'या' तीन बाजार समितीवरील स्थगिती उठली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 2:17 PM