पेरणोली: आजरा तालुक्यातील हारपवडे येथील धनगरवाड्यावरुन दवाखान्यासाठी झोळीतून आणत असताना घनदाट जंगलातच महिलेची प्रसूती झाली. रंजना जयवंत झोरे असे त्या महिलेचे नाव आहे.सोमवारी (दि. २१) रात्री आठ वाजल्यापासून रंजना यांना प्रसूतीकळा सुरू झाल्या. रस्त्याअभावी गाडी येत नसल्याने चादरेची झोळी करुन नातेवाईक तिला अंधारातून पायी पेरणोली उपकेंद्राकडे आणत होते. रात्री ११ च्या सुमारास कुमरी ओढ्याच्या कडेला वेदना सहन करत झोरे यांनी एका मुलीला जन्म दिला. यावेळी मालूबाई अंकुश झोरे यांनी प्रसूती केली. प्रसूतीनंतर पुन्हा बाळाला व आईला झोळीमधून नावलकरवाडी येथे नेले.दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेतून दोघांना आजरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाला व आईला सुखरुप आणण्यासाठी धोंडीबा लहू झोरे, जयवंत अंकुश झोरे, राहुल अंकुश झोरे, नवलु भागु झोरे ,लक्ष्मण साजु झोरे, भागु नवलू झोरे, जयवंत भागु झोरे गंगाराम झोरे, विठ्ठल अंकुश झोरे, झिमदेव येडगे, विशाल झोरे, मालुबाई अंकुश झोरे, नकुशा धोंडीबा झोरे आदींनी परिश्रम घेतले.
रस्त्याचा प्रश्न ऐरणीवररंजनाच्या प्रसूतीच्या निमित्ताने धनगरवाड्यावरील रस्त्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. रस्त्याला मंजुरी मिळाल्याची चर्चा आहे. रस्त्याचा काही भाग वन विभागातून जात असल्यामुळे काम रखडले आहे.'आशा'च आली धावूनरात्री एकच्या सुमारास पेरणोली उपकेंद्रातील आशा स्वयंसेविका रेखा दोरुगडे यांना बोलवून घेतले. त्यांनी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी बाळ व आईला आजऱ्याला पाठविले...अन् दुर्घटना टळलीजंगलातून येताना नैसर्गिक प्रसूती झाल्यामूळे दुर्दैवी घटना टळली. अन्यथा अनर्थ घडला असता.