कोल्हापूर : प्रसारमाध्यमांनी पुण्यातील मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेबद्दल माझ्याकडे विचारणा केली असता मी एक शब्द वापरला. हा शब्द मी कोणत्याही व्यक्तीविरोधात नव्हे तर विरोधकाला तुरुंगात घालू इच्छिणाऱ्या प्रवृत्तीविरोधात वापरला, असे स्पष्टीकरण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी निवडक पत्रकारांशी स्वत:हून संवाद साधला व वादग्रस्त वक्तव्याबद्दलही स्वत:हूनच स्पष्टीकरण दिले. मी वैयक्तिक कोणाचे नाव घेऊन तो शब्द वापरला नव्हता, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर पत्रकारांनी मग तुम्ही नेमके कोणाला समोर ठेवून हे बोलला अशी विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, ‘ते तुम्हाला माहिती आहेच की’ असे सांगून त्यांनी या विषयांवर पडदा टाकला. ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात मुश्रीफसाहेब हे बोलणे बरे नव्हे, असे वृत्त देऊन त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल सडेतोड लिहिले होते. ते जोरदार व्हायरल झाल्यावर मंत्री मुश्रीफ यांच्याकडून हे स्पष्टीकरण झाले.मुश्रीफ म्हणाले, २ ते १० आक्टोबर या कालावधीत कोल्हापूरसह कागल मतदारसंघात जंगी उद्घाटने आणि लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. शेंडा पार्कमधील तयार इमारतींचे लोकार्पण, नव्या रुग्णालयांचे भूमिपूजन आणि जिल्हा बॅंकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे. उत्तूर येथील योग आणि निसर्गोपचार महाविद्यालयाचे भूमिपूजन आणि कागल येथील एक कार्यक्रम गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.जागावाटपाबाबत ते म्हणाले, जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार स्वगृही, माहेरी, सासरी जात आहे. शिरोळ विधानसभेची जागा आम्ही याआधी राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली हाेती. त्यातून राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष उभे राहिले. ती जागा राष्ट्रवादीला मिळावी आणि यड्रावकर यांनी आमच्याकडून लढावे, असाही प्रयत्न आहे.
लाडक्या बहिणीमुळे २५ टक्के जनमत वाढलेलाडक्या बहिणीमुळे जनमत आमच्या बाजूने १० टक्के येईल, असा आमचा अंदाज होता; परंतु दोन्ही हप्ते जमा झाल्यानंतर ते २५ टक्यांनी वाढल्याचे सर्वेक्षणात दिसून आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.