कोल्हापूर : दोन शेतकऱ्यांना ५० गुंठे जमिनीसाठी बाजारभावानुसार दर हवा आहे, तो द्यायला प्रशासन तयार नसल्याने राजाराम बंधाऱ्याला समांतर पुलाचे काम गेल्या सात वर्षांपासून रखडलेले आहे. वडणगेच्या बाजूची पाच गुंठ्याची रक्कम अदा केली असली तरी उर्वरित पाच गुंठ्याची आणि कसबा बावड्याकडील बाजूची ४५ गुंठ्यासाठी बाजारभावाने केलेली मागणी मान्य नसल्याने हे काम बंद आहे.कसबा बावड्याहून वडणगेकडे जाणाऱ्या राजाराम बंधाऱ्याला समांतर पूल बांधण्यात येत आहे. ७.५ मीटर रुंद आणि १९२ मीटर लांब असलेल्या या पुलाच्या कामाची २४ महिन्यांची मुदत जानेवारी २०१९ मध्ये संपली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादनासंदर्भात अनेक बैठका झाल्या, परंतु यातून तोडगा निघालेला नाही.सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवाल आल्यानंतर विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत सक्तीचे भूसंपादन होणार आहे. मात्र तोपर्यंत या कामाचे घोंगडे भिजतच राहणार आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप अहवाल आला नसल्यामुळे पुढील कार्यवाही झालेली नाही. या पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या जोड रस्त्यांसाठी दोन्हीकडच्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन होणे बाकी होते. यापैकी वडणगेच्या बाजूला २५० मीटर जोड रस्त्यासाठी वडणगे परिसरातील शेतकऱ्यांच्या बाजूच्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया आता मार्गी लागली आहे. येथील शेतकरी विजय निवृत्ती रणदिवे यांना पाच गुंठ्यासाठी ३ लाख ४६ हजार मिळालेले आहेत. मात्र पुलालगतच्या पाच गुंठ्याच्या जागेसाठी त्यांनी बाजारभावाने केलेली मागणी सरकारला मान्य नाही. त्यामुळे वडणगेच्या बाजूचे भूसंपादन रखडलेले आहे. कसबा बावड्याच्या बाजूला १८५ मीटर भूसंपादन बाकी आहे. या बाजूचे शेतकरी जयदीप विलास जामदार यांनी त्यांच्या ४५ गुंठे जागेचा दर बाजारभावाने मागणी केली आहे. यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना जोपर्यंत भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत या कामाला प्रारंभ होणार नाही. एकूण सातपैकी डिसेंबरअखेर या पुलाचे सहा पिलर उभारले आहेत. जमीन ताब्यात मिळताच काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती या बांधकामाचे कंत्राटदार राहुल पटेल यांनी सांगितले.
बावडा-वडणगे परिसरातील नागरिकांची सोयदरवर्षीच्या पूरस्थितीत कोल्हापूर शहराला जोडणारा कसबा बावडा येथील राजाराम बंधारा रस्ता पाण्याखाली जातो. याठिकाणी या काळात १८ फूट पाणीपातळी वाढते. दोन महिने या काळात या मार्गावर होणारी बावडा-वडणगे रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. हा पूल झाल्यास कसबा बावड्याहून वडणगे मार्गे रत्नागिरी महामार्गाकडे आणि वडणगे परिसरातून बावडा मार्गे औद्योगिक वसाहतीकडे कामासाठी ये-जा करणाऱ्या तसेच परिसरातील २० ते २५ गावांचा संपर्क तुटतो. यामुळे दोन महिने वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे. पावसाळ्यात हा मार्ग बंद राहिल्याने सर्वांनाच लांबचा पल्ला टाकून यावे लागते.
नाबार्डकडून १७ कोटींचा निधी झाला होता मंजूरया पुलास पर्यायी आणि समांतर पुलासाठी नाबार्डकडून २०१७ मध्ये १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु हे काम भूसंपादनामुळे रखडलेले आहे.
जमिनीचे दर सव्वाचार पट अधिककाम सुरू केले तेव्हा २०१७ मध्ये या जमिनींचे दर कमी होते. परंतु त्यावेळीही संबंधित दोन्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या जागा हस्तांतरित करण्यास विरोध केला होता. आता या कामासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परंतु शेतकऱ्यांनी सव्वाचार पट दराने जमिनीचे मूल्यांकन केले आहे. ऑक्टोबर महिन्याअखेर भूसंपादनाचा हा विषय मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सध्या पुलाच्या कामासाठी वाढीव निधीची तरतूदही नाबार्डकडून करण्यात आली आहे.
या जमिनी संपादित करण्यापूर्वी आमच्यापैकी कोणाशीही प्रशासनाने चर्चा केली नव्हती. बाजारभावाच्या दुपटीने दर देण्याचा नियम असताना संबंधित अधिकारी ग्रामीण दराने रक्कम देण्याची भाषा करत आहेत. यासंदर्भात कोणतीही नोटीस दिलेली नाही. -जयदीप जामदार, शेतकरी, कसबा बावडा
गेल्या चार वर्षांपासून अधिकाऱ्यांकडून चर्चा थांबलेली आहे. बाजारभावाने दर मागण्याचा आमचा हक्कही डावलला जातो आहे. शेतीची किंमत आणि व्यवसायासाठीचा दर यांची सांगड घातली जात नाही. -विजय रणदिवे, शेतकरी, वडणगे.