लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीत वारंवार येणाऱ्या महापुराच्या उपाययोजनांसाठी जागतिक बँकेची समिती आज बुधवारी कोल्हापुरातील पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. दुपारी एक वाजता समितीतील सदस्य कोल्हापुरात येतील. प्रयाग चिखली, गायमुख, दुधाळी, राजाराम बंधारा येथील पाहणी केल्यानंतर सायंकाळी साडे पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, कोल्हापूर व सांगलीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. तत्वत: हा प्रकल्प ३२०० कोटींचा आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने जागतिक बँकेचे सदस्यांची समिती आज बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे. हा प्रकल्प मित्र संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असून संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, संबधित प्रशासकीय अधिकारी व वर्ल्ड बँक प्रतिनिधी मिळून पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.दुपारी १.०० वाजता समितीचे कोल्हापुरात आगमन.
१.३० वाजता : प्रयाग चिखलीसह पुरग्रस्त भागांची पाहणी२.०० जोतिबा डोंगरावरील डोंगर खचणाऱ्या गायमुख परिसराची पाहणी
३.३० : दूधाळी परिसरात पाहणी४.०० राजाराम बंधारा येथे पाहणी
सायंकाळी ५.३० वाजता : जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि सांगलीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक----------------
उद्याच अहवाल सादरपुरग्रस्त भागांचे सादरीकरण, अनुभव, बाधीत होणाऱ्या वास्तू, नद्यांची स्थिती, बंधारे, नाले, खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयदेखील पुराच्या पाण्यात वेढले जाते. या वस्तुस्थितीची माहिती देऊन उपाययोजनांवर चर्चा केली जाईल. यानंतर समिती सदस्य मुंबईला जाणार असून गुरुवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत पाहणी अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर सर्व्हेक्षण व उपाययोजनांवर काम सुरू होईल अशी माहिती जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी दिली.