सचिन भोसलेकोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरसह परदेशातील मल्लांना राजाश्रय देऊन कुस्ती जोपासली. कुस्तीसाठी खासबाग अर्थात कुस्त्यांच्या मैदानाची उभारणी केली. अनेक दिग्गजांनी देशासह परदेशातील दिग्गज मल्लांना अस्मान दाखविले. त्याकाळातील कुस्ती दंगलींचे निकाल, कागदोपत्री माहिती आणि त्या काळातील छायाचित्रे एका क्लिकवर पाहता यावीत याकरिता डिजिटलायझेशन होणे गरजेचे आहे. ही माहिती डिजिटल रुपात संकलित झाली तर राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीत खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल.कोल्हापूरच्या मातीत दोनशे वर्षांची कुस्ती परंपरा जपणारी १८२५ मध्ये स्थापन झालेली मोतीबाग तालीम आहे. तर या मातीत पूर्वीच्या हिंदुस्तानातील लाहोरपासूनचे दिग्गज मल्ल येऊन कुस्ती जिंकून आणि स्थानिकांकडून चितपटही होऊन गेले आहेत; मात्र या सर्वांची एकत्रित माहिती व जुन्या काळातील मल्लांची छायाचित्रेही अधिकृतरित्या डिजिटलायझेशन करण्यात आलेली नाही.
त्यामुळे हा कुस्तीचा वसा आणि वारसा आजच्या पिढीला कसा कळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाने चार वर्षांपूर्वी पुढाकार घेतला होता; पण अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. यंदाच्या वर्षात हे काम पूर्ण झाले तर राजर्षी शाहू महाराजांना स्मृति शताब्दी वर्षात खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल.
संकेतस्थळही आवश्यककोल्हापूरची कुस्ती ज्यांच्या कार्यामुळे जपली आहे, अशा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाने याबाबत लवकरच पुढाकार घेऊन डिजिटलायझेशनसह संकेतस्थळही सुरू करावे. अशी मागणी कुस्ती प्रेमींकडून होत आहे.
यांच्या कुस्त्या आणि छायाचित्रांचे जतन आवश्यकगुलाम पैलवान, रहिमानी, कल्लू पैलवान, हमिदा पंजाबी, सादिक पंजाबी, रमजी, किकर सिंग, तब्बू सिंग, कल्लू गामा, अलम चुआ, जीझा पैलवान, झोबिस्की (पोलंड), छोटा हमिदा, सरदार गामा, गोगा पैलवान, बाबू बिरी, देवाप्पा हळीगळे, जिन्नापा अकिवाटे, रामचंद्र शिंदे, ऑलिम्पिकवीर के. डी. माणगावे (प्रथम सुबराव गवळी तालीम, नंतर मोतीबाग),
ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, हिंदकेसरी चंबा मुत्नाळ, महान भारत केसरी दादू चौगुले, बागडीबहाद्दर पी. जी. पाटील, कुस्तीसम्राट युवराज पाटील, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतारे, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, जागतिक शालेय कुस्तीत विजेतेपद पटकाविलेले संभाजी पाटील-कोपार्डेकर, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग आदी मल्लांचा समावेश आहे.