हातकणंगले : कबनूर ता.हातकणंगले दत्तनगर येथील स्वप्निल मारुती पाटील (वय २२) हा गणपती विसर्जनासाठी पाण्यात उतरला असता, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नसल्याने पंचगंगा नदीमधून वाहून गेला. व्हाइट आर्मी, हातकणंगले आणि इंगळी येथील रेस्क्यू टीम, रुई - कबनूरच्या स्थानिक ग्रामस्थ आणि हातकणंगले पोलीस यांच्याकडून शोधकार्य सुरू आहे.
कबनूरच्या दत्तनगर गल्ली नंबर ८ मध्ये मारुती पाटील कुटुंबीय राहते. पंचगंगा नदीमध्ये गौरी-गणपती विसर्जनाला बंदी असतानाही, पाटील कुटुंबीय सोमवारी दुपारीच रुई येथील बंधाऱ्यावर घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी गेले होते. गणपती पाण्यामध्ये विसर्जन करण्यासाठी स्वप्निल पाटील हा पाण्यात उतरला असता, त्याचा पाण्यात तोल गेल्याने पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नसल्याने, पाण्याच्या प्रवाहात स्वप्निल पाण्याबरोबर वाहून गेला.
स्वप्निल पाटील हा सीएनसी व्हीएमसी मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्यांचे वडील मारुती पाटील सेंट्रिंग आणि गवंडी काम करतात. तीन मुलींच्या जन्मानंतर स्वप्निलचा जन्म झाला होता. पाटील कुटुंबाचा एकुलता एक मुलगा आधार होता.