अमर पाटीलकळंबा : दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात सोने, दुचाकी, कार, इलेक्ट्रानिक्स वस्तूच्या खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल झाली. मात्र सुर्वेनगरात राहणाऱ्या एका युवकाने खरेदी केलेल्या दुचाकीचीचं गावभर चर्चा रंगली. चर्चा तर होणारच, भावानं काय एक-दोन नाही तर तब्बल २१ लाखांची दुचाकी घेतलीयं. अन् ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली.सुर्वेनगरातील दत्त जनाई नगरात राहणाऱ्या राजेश चौगुले याने ही तब्बल २१ लाखांची दुचाकी खरेदी केलीय. कावासकी निंजा झेडएक्स १० आर असे या दुचाकीचे नाव आहे. राजेशने साई मंदिर कळंबा ते राहत्या घरापर्यंत ढोलताशांच्या गजरात गाडीची वाजतगाजत मिरवणूक काढली. २१ लाखांची ही दुचाकी पाहण्यासाठी परिसरातील लोकांची एकच झुंबड उडाली. २१ लाखाच्या या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे १००० सीसी इंजिन, १८ लिटर इंधनटाकी, १५ किमी प्रति लिटर मायलेजसह २५५ किमी प्रतितास आहे. तर हायस्पीड ३०२ किमी प्रतितास आहे.राजेशचे मूळचे गाव कागल तालुक्यातील कापशी माध्याळ. वडील फोटोग्राफर असून गेली कित्येक वर्षांपासून चौगुले कुटुंबीय सुर्वेनगरात स्थायिक झाले आहेत. राजेश यांनी घोडावत इंजिनिअरिंग कॉलेज मधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून काही काळ बेंगळुरूमध्ये नोकरी केली. यानंतर त्याने स्वतःचा शेअर मार्केटचा व्यवसाय सुरू केला. दुचाकी गाड्यांची मोठी हौस असल्याने त्यांनी बुलेट, स्पोर्ट्स बाईक, कार अशा अनेक गाड्या खरेदी केल्या. पण आगळीवेगळी दमदार गाडी खरेदी करण्याची हौस त्यांनी नुकतीच पूर्ण केली. असून २१ लाखांच्या या दुचाकीची चर्चा अख्ख्या जिल्ह्यात रंगली आहे.
चर्चा तर होणारच! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने घेतली २१ लाखाची बाईक, वाजतगाजत काढली मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 5:49 PM