कोल्हापूर : एकेकाळी कोल्हापूर शहर तलाव आणि विहरींची शहर म्हणून ओळखले जात असे; परंतु काळानुसार शहरातील नागरी वस्ती वाढली आणि अनेक तलाव आणि विहिरींची चोरी झाली. पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या शहरातील तलाव कचरा, खरमाती टाकून बुजविले गेले. सध्या त्याठिकाणी इमारती, बाजारपेठा भरविल्या जात आहेत. काही ठिकाणी क्रीडांगणे तयार झाली आहेत. नागरिकांच्या कृतघ्नपणामुळे शहरातील मोठ्या स्वरूपाचे किमान १० ते १२ तलाव तसेच २० हून अधिक विहिरी गायब झाल्या आहेत.
कोल्हापूर शहराला एक पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून देशात कोल्हापूर शहराचा नावलौकिक आहे. शहराला लागून वाहणारी पंचगंगा नदी आणि शहरातील विविध भागात असलेले तलाव, खासगी तसेच सार्वजनिक विहिरी हेच या शहराच्या संपन्नतेचे प्रतीक होते. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत, खुदाई करताना लागणारे पाण्याचे उमाळे त्याची आजही साक्ष देते.
शहरातील रंकाळा, कळंबा, कोटीतिर्थ, राजाराम तलाव या चार तलावांचे अस्तित्व आजही असून त्यांचे जनत व संवर्धन चांगल्या पद्धतीने केले आहे. परंतु काळाच्या ओघात वरुणतिर्थ, कपिलतिर्थ, रावणेश्वर, सिद्धाळा, पद्माळा, खंबाळा, खाराळा, फिरंगाई, कुंभारतळे, ससूरबाग या तलावांचे अस्तित्व संपले आहे. अंबाबाई मंदिराजवळील काशीकुंडची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तर मातीच्या ढिगाऱ्यात मुजलेला पौराणिक महात्म्य लाभलेल्या मणकर्णिका कुंडाची पुन्हा एकदा खुदाई करून त्याचे नुकतेच संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. बुजविलेल्या तलावाच्या ठिकाणी व्यापारी संकुल, क्रीडांगणे, भाजी मार्केट उभारली गेली आहेत.
हे घ्या पुरावे .....
१. खंबाळा तलाव - ताराबाई रोडवरील बाबुजमाल दर्ग्याच्या समोर खंबाळा तलावाचे अस्तित्व होते. कालांतराने हा तलाव बुजविण्यात आला आहे. त्याठिकाणी पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली होती. आता तेथे बहुमजली पार्किंग इमारत बांधली जात आहे. त्याच्या खुदाईवेळी तलावाचे अवशेष पाहायला मिळाले. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. अनेक वस्तू सापडल्या. आता ही इमारत पूर्ण झाल्यावर तलावाचे अस्तित्व कायमचे मिटणार आहे.
२. वरुणतिर्थ - आज ज्या ठिकाणी गांधी मैदान तयार करण्यात आले आहे, त्याठिकाणी मोठे तळं होतं. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत असलेले तळ्यात आजूबाजूने सुद्धा पाणी येत होते. या परिसरात छोटी छोटी मंदिरांचे अस्तित्व सुद्धा होते. सध्या तलावात भर टाकून बुजवून त्याठिकाणी खेळाचे मैदान करण्यात आले आहे. परंतु पावसाळ्यात हा तलाव आपलं मूळ स्वरूप दाखवित असतो. यंदाच्या पावसाळ्यात तर या ठिकाणी बारा फुट पाणी साचून राहिले होते.
३. मुळे विहीर-शहरात कुठंही आग लागली की, ती विझविण्यासाठी पाणी, घेण्यासाठी अग्निशमनचे बंब या मुळे विहिरीवर धाव घ्यायचे. प्रशस्त बांधकाम आणि बारा महिने पाणी असलेल्या या विहिरीचा वापर शहरातील पाणीटंचाईच्या काळात सुद्धा होत होता. परंतु पुरेशा देखभालीअभावी या विहिरीची पडझड झाली आहे.
कोट-
कोल्हापूर सहा खेड्यांचं गाव होतं. शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे जागेची उपलब्धता व्हावी म्हणून असलेली तळी, कुंड बुजविण्यात आली. स्थानिक प्रशासनास त्याची योग्य निगा राखता आली नाही. त्यामुळे दलदल झाली. दलदलीपासून सुटका व्हावी म्हणून त्याठिकाणी खरमाती टाकून बुजविण्यात आली. त्यावेळी स्थानिक प्रशासनाला या विहिरी, तलाव यांचे महत्व समजले नाही.
ॲड. प्रसन्न मालेकर, जलस्त्रोतांचे अभ्यासक
कोट -
पूर्वीच्या काळी शहर गावठाणाची हद्द खूपच छोटी होती. नागरी वस्ती वाढेल तसे गावठाणाच्या बाहेर विकास व्हायला लागला. नागरी वस्ती वाढायला लागली. त्यावेळी गावाच्या बाहेर गावाच्या काठांवर असणारी तळी, कुंड त्या त्या काळाच्या गरजेनुसार, नियोजनानुसार त्यावेळच्या प्रशासनाने बुजविली हे वास्तव आहे.
-नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता महानगरपालिका, कोल्हापूर