इस्लामपूर : जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या त्या-त्या तालुक्यातील परिस्थिती व ताकदीचा विचार करुन स्थानिक आघाडी करुन लढू. वाळवा तालुक्यातील ही निवडणूकसुध्दा ‘इस्लामपूर पॅटर्न’चा अवलंब करीत विकास आघाडीच्याच माध्यमातून लढणार आहोत. वाळवा पंचायत समितीवर विकास आघाडीचीच सत्ता आणणार, असा विश्वास कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.इस्लामपूर नगरपालिकेतील सत्तापरिवर्तनानंतर विकास आघाडीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कार्यभार स्वीकारला, यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खोत म्हणाले की, राज्यातील सत्तांतरानंतरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्मारकाचा विषय गतीने कार्यान्वित करण्यात आला. मराठा आणि बहुजन समाजाची मते मिळवून १५ वर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेस—राष्ट्रवादीच्या सरकारने छत्रपतींच्या स्मारकासाठी काय केले, हा प्रश्न स्वत:लाच विचारावा. त्यांचे किती मुख्यमंत्री आले आणि गेले. मात्र स्मारकाचा प्रश्न प्रलंबितच राहिला. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा द्रष्टा मुख्यमंत्री लाभला. काँग्रेस आघाडी सरकारला मराठा व बहुजन समाजातील मुलांना ईबीसी सवलत देता आली नाही. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावे ही ईबीसी सवलत देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री फडणवीस यांनीच घेतला. छत्रपतींच्या स्मारकाचे आता भूमिपूजन झाले आहे आणि उद्घाटनही आम्हीच करणार आहोत. विरोधकांना फक्त त्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण आम्ही देऊ, असा टोला खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता मारला.ते म्हणाले की, यावेळची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही धनशक्तीविरुध्द जनशक्ती अशीच होईल. या लढाईत जनशक्तीचा विजय निश्चित असेल. जि. प., पं. स. निवडणुकीबाबत आ. शिवाजीराव नाईक हे पक्षपातळीवर लढणार आहेत का, या प्रश्नावर खोत म्हणाले की, कोणाची काय भूमिका आहे यापेक्षा, जिथेपर्यंत वाळवा तालुक्याची हद्द आहे, तिथेपर्यंत ही निवडणूक विकास आघाडीच्याच झेंड्याखाली लढवून पंचायत समितीवर सत्ता आणू.यावेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, विक्रम पाटील, आनंदराव पवार, वैभव पवार, सतीश महाडिक, प्रवीण पाटील, जे. एस. पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
रत्नागिरीत नाटकाच्या वेडापायी अडीच लाखांची चोरी
By admin | Published: December 26, 2016 10:59 PM