कोल्हापूर : कोरोनाचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या बंद घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ४० हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना कळंबा येथील बापूराम नगरात घडली. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बापूराम नगरात राहणारे एक खासगी नोकरदार हे कुटुंबांसह भुदरगड तालुक्यातील सासुरवाडीत गेले होते. तेथे त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी घेतली. त्यांना कोरोना लागण झाल्याचा अहवाल आला. त्यामुळे त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, त्यांची पत्नी दोन मुलांसह गावीच राहिले. बापूराम नगरातील त्यांचे बंद घर पाहून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला, तसेच आतील पाण्याचे मीटर व तिजोरीतील एक तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस चोरून नेला.दरम्यान, बुधवारी सकाळी त्यांच्या घरातून पाणी वाहत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी शेजाऱ्यांनी पहाणी केली असता, चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.