कोल्हापूर : देवदर्शनासाठी कोल्हापुरात आलेल्या मुंबईतील महिला भाविकाची सुमारे १३ हजार रुपये व महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स चोरट्याने लंपास केली. ही चोरीची घटना शनिवारी सायंकाळी महाद्वार रोडवर घडली. सायली निवृत्ती पवार (वय २८ रा. अजिंक्यतारा सोसायटी, मुंबई वेस्ट) यांनी या चोरीची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे.
गेल्या दोन महिन्यात महाद्वार रोडवर महिलांच्या पर्स चोरीच्या घटना वाढल्या आहेत. महाद्वार रोडवर सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. विविध उपाययोजना करुनही चोरीच्या घटना न थांबल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी सायली पवार या श्री अंबाबाई देवदर्शनासाठी मुंबईहून आल्या होत्या. देवदर्शनानंतर खरेदीसाठी महाद्वार रोडवर फिरत असताना चोरट्याने त्यांच्या काखेत असणाऱ्या मोठ्या पर्समधील लहान लाल रंगाची पर्स चोरली. या चोरलेल्या पर्समध्ये १३ हजारांची रोख रक्कम, दोन बॅंकांची एटीएम कार्ड तसेच आधारकार्ड व महत्वाची कागदपत्रे होती. या चोरीची तक्रार पवार यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे.