कोल्हापूर : मिरजकर तिकटी परिसरातील विठ्ठल मंदिर आणि साई मंदिर या दोन मंदिरांतील दान पेट्याच चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना रविवारी मध्यरात्री घडल्या. चोरट्यांनी आता थेट मंदिरातील ऐवजावरच हात साफ करण्यास सुरुवात केल्याने भाविकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार पेठ, गुलाब गल्ली कॉर्नरजवळ लेटेस्ट तरुण मंडळाचे श्री साईनाथ मंदिर आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने या मंदिराचा मुख्य दरवाजा व अंतर दरवाजाची दोन्हीही कुलपे तोडून आतील चक्क दानपेटीच लांबविली.
दानपेटीत किती रक्कम होती, याचा उलगडा होऊ शकला नाही. चोरट्याने तोडलेली दोन्हीही कुलपे शेजारी चहागाडीमागे टाकून दिली. दरम्यान, सोमवारी पहाटेच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे संस्थापक गजानन यादव, पुजारी सुरेश वडगावकर, अशोक महामुनी यांच्यासह कार्यकर्ते जमा झाले. पोलीसही तातडीने घटना स्थळी येऊन त्यांनी तपासणी केली.दरम्यान, मिरजकर तिकटी चौकातील विठ्ठल मंदिरामध्येही चोरी झाल्याचा प्रकार सकाळी जुना राजवाडा पोलिसांच्या निदर्शनास आला. तेथीलही दानपेटी चोरून नेण्यात आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.पॅरोलवरून सुटलेल्या कैद्याकडून चोरीची शक्यतासाई मंदिरमधील चोरीचा प्रकार हा शेजारील पान शॉपच्या दुकानावर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ते फुटेज जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरटा हा युवक असून, त्याच्या अंगात लाल शर्ट घातल्याचे दिसून येते. पोलिसांना त्याची ओळख पटली असून, तो काही दिवसांपर्वी कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला आहे. त्यानंतर त्याने चोरीचे कृत्य केल्याचे दिसून येत आहे. विठ्ठल मंदिरातील चोरीही त्यानेच केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.वृत्तपत्र विक्रेत्याचे कौतुकपहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वृत्तपत्र विक्रेते सुनील समडोळीकर हे वृत्तपत्र घरोघरी टाकत असताना हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तातडीने संस्थेचे विश्वस्त व पोलिसांना माहिती दिली.