कोल्हापूर : ताराबाई पार्कातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञाताने सव्वादोन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी अभिजित अरुण कुलकर्णी (वय ५२, रा. चिंतामणी रेसिडेन्सी, कर्वेनगर पुणे, मूळ रा. ताराबाई पार्क, अभिशिल्प बंगला, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी कुलकर्णी हे नोकरी, व्यवसायानिमित्त पुणे येथे राहतात. मूळचे कोल्हापूरचे असल्याने त्यांचा ताराबाई पार्क परिसरात बंगला आहे. कामानिमित्त ते २ ते २४ डिसेंबर या कालावधित ते पुण्यात होते. या कालावधित त्यांच्या बंद बंगल्याला लावलेले कुलूप अज्ञाताने तोडून बेडरुममधील सोन्याचे मंगळसूत्र, मोती व पोवळे असे १५ ग्रॅम, सोन्याची सहा कर्णफुले प्रत्येकी वजन १० ग्रॅम, दोन ग्रॅम वजनाची सोन्याची दोन नाणी, प्लॅटिनम धातूचा गळ्यातील हार, हिरे जडवलेली दोन कर्णफुले, ४०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या दोन समई, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन ग्लास, दीडशे ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या वाट्या, दीडशे ग्रॅम वजनाचा चांदीचा गणपती, शंभर ग्रॅम वजनाची दोन चांदीची निरांजन, सुपारी ठेवण्याचे चांदीचे १०० ग्रॅम वजनाचे भांडे व एक हजार ग्रॅम वजनाचा मिकीस असा सुमारे २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.
चोरीची फिर्याद दाखल झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी चोरीच्या ठिकाणी भेट दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड करीत आहेत.