आठवड्यापूर्वी कसबा वाळवे येथे झालेल्या चोरीचा छडा लावण्यास राधानगरी पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. आठ दिवस तपास करूनही काहीच धागेदोरे हाती लागले नाहीत. यापूर्वी झालेल्या कोणत्याही चोरीचा छडा पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे राधानगरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मागील शुक्रवारी ( दि. १९) कसबा वाळवे येथील आप्पासो सखाराम पाटील यांच्या बंद घराचे दार व घरातील लोखंडी कपाट फोडून नऊ तोळे सोन्याचे जिन्नस व ३५ हजार रोख असा साडेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता. याची फिर्याद राधानगरी पोलिसांत दाखल झाली आहे. पोलिसांनी श्वानपथकाच्या साहाय्याने माग घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्याने हात वर केल्याने त्याला सोडून देण्यात आले.
चार महिन्यांपूर्वी येथेच अडीच लाखांची घरफोडी झाली होती. त्याचाही तपास लागलेला नाही. याशिवाय मागील काही वर्षांत कौलव, घोटवडे, धामोड, कसबा तारळे, पिरळ, राधानगरी येथे अनेक चोऱ्या झालेल्या आहेत. मात्र, यातील एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. ज्यांची चोरी झाली ते चौकशी करून थकले आहेत.