श्रीकांत ऱ्हायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड : बुरंबाळी (ता. राधानगरी) येथील जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या नावे असलेल्या तब्बल चौदा एकर जमिनीवर बुरंबाळी ग्रामस्थांनी परस्पर डल्ला मारला असून, या जमिनीची परस्पर विल्हेवाट लावली आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिकांबरोबरच सर्वसामान्य लोकांनीही या जमिनीवर स्वतःचा हक्क सांगत कंपाउंड करत जागेचा ताबा घेतला आहे, तर गावातील गायरान जमिनीमध्येसुद्धा मोठे अतिक्रमण करून त्या जमिनीचाही ताबा घेतल्याने आता ग्रामपंचायतीनेच हे अतिक्रमण काढण्याची मागणी केल्याने गावात मोठा गोंधळ उडाला आहे.
तुळशी धरण उभारणीमुळे संपूर्ण बुरंबाळी गाव धरणग्रस्त बनले. या गावाची जवळपास ७० ते ८० टक्के जमीन या धरणात गेली व सर्व गाव धरणग्रस्त बनले. १९७८ नंतर तुळशी जलाशयाच्या पूर्व बाजूच्या किनाऱ्यावर बुरंबाळी गावाची स्थापना झाली व येथील गट नं. ५८ व ५९ मधील २ हेक्टर ६६ आर जमीन शासनाने गावातीत ६४ कुटुंबांना ३ गुंठे ते ६ गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट करून वाटप केली; पण कब्जेपट्टी एक व वहिवाट दुसरीच, यामुळे या जमिनीचेही सातबारा चुकीच्या पद्धतीने झाले, तर दुसरीकडे याच दोन गट नंबरमधील उर्वरित चौद एकर जमीन सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन एका खाजगी शेतकऱ्याच्या नावावरून काढून घेत ती जिल्हाधिकारी पुनर्वसन कोल्हापूर यांच्या नावे करून घेण्यात यश मिळवले; पण गेल्या दोन- चार वर्षांपासून या संपूर्ण जमिनीवर गावातील प्रतिष्ठित लोकांनी अतिक्रमण करत ही जागा बळकावली आहे. सध्या या जागेवर अनेकांनी घरे, जनावरांचे शेड, वाहनांचे शेड उभारले आहे, तर काहींनी जागेभोवती कंपाउंड मारले आहे. गावात ज्यांची टोलेजंग घरे आहेत, अशांनीही फायदा उठवत, ही शासकीय जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आहे, तर वाटप केलेल्या २ हेक्टर ६६ आर जमिनीपैकी शिल्लक गायरान जमीनही काही धनदांडग्यांनी बळकावली आहे, तर याच ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या देऊळवाडी वसाहतीमध्येही १५२/२ या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या गटातील जवळपास नऊ एकर दहा गुंठे जमीन येथील शिवाजी धोंडिराम जांभळे यांनी बळकावली असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेली जवळपास २३ एकर इतकी जमीन एका ग्रामपंचायतीतील लोक परस्पर विल्हेवाट लावत असताना महसूल प्रशासन नेमके काय करते, असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.
प्रतिक्रिया
माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या नावे असलेल्या सर्वच जमिनीवर पूर्णत: अतिक्रमण झाले असून, गावच्या गायरान जमिनीवरही लोकांनी परस्पर ताबा घेतला आहे. प्रशासनाने यावर वेळीच कठोर पावले उचलत गायरान जमीन अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करत ग्रामपंचायत प्रशासनाला परत मिळवून द्यावी.
-माधवी विष्णू चौगुले
(सरपंच, ग्रा.पं. बुरंबाळी)