इचलकरंजी : येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवलेले लाखो रुपयांचे भंगाराचे साहित्य लंपास करून चोरट्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलीस ठाण्याच्या बंदिस्त आवारातच चोरी झाल्याने गस्त व सुरक्षेचा चांगलाच फज्जा उडाला आहे. याबाबत एका चोरट्यास ताब्यात घेऊन चोरलेले साहित्य परत आणून देण्यासाठी त्याच्याकडे पोलिसांनी तगादा लावला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातीलच लाखो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे बाहेर पडले, तर जिल्ह्यात मोठी नामुष्की होईल, या भीतीने पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या या प्रकरणाचा तपास सुरूकेला आहे. साधारण एक महिन्यापूर्वी पूर्वीपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस ठेवण्यात आलेला विविध गुन्ह्यांतील मुद्देमाल व साहित्य चोरीस गेले. याबाबत कोणत्याही पोलिसाला समजले नाही. ही खंत असून, काही दिवसांनंतर एका पोलीस अधिकाऱ्याला साहित्य विस्कटल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी मुद्देमालाची यादीप्रमाणे तपासणी केली असता काही मुद्देमाल चोरीस गेल्याचे समजले. पोलिसांनी गोपनीयरीत्या तपास करीत परिसरातीलच एका चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चोरलेले साहित्य लाखो रुपयांचे असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्याकडून बराच मुद्देमाल ताब्यातही घेतला असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
पोलीस ठाण्याच्या आवारातच चोरी
By admin | Published: March 29, 2015 12:21 AM