कोल्हापूर : राजारामपुरीत वृद्ध दाम्पत्यांच्या बंगल्यात चोरट्याने चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेराचे थेट चित्रण पुण्यातील नातीने मोबाइलवर पाहिले अन् तिने केलेल्या फोनमुळे पोलिसांनी राजारामपुरीत घटनास्थळी धाव घेतली, परिसरात बघ्यांची गर्दी झाली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली, रात्री उशिरापर्यंत चोरीचा गुन्हा नोंद झाला नाही; पण पोलिसांची मात्र चांगलीच तारंबळ उडाली.
राजारामपुरीत तीन मजली घरात फक्त वृद्ध दाम्पत्य राहते. त्यांचा मुलगा पुण्यात राहतो, राजारामपुरीतील घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, त्याचे चित्रण थेट पुण्यातील त्यांच्या नातीच्या मोबाइलवर दिसते. मंगळवारी दुपारी हे दाम्पत्य फिरायला घराबाहेर पडले. त्याच दरम्यान, त्यांच्या घरात चोरटा शिरला. तो घरात हेरगिरी करताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे थेट चित्रण त्यांच्या पुण्यातील नातीच्या मोबाइलवर दिसले. नातीने तातडीने राजारामपुरी पोलिसांशी फोनवरून संपर्क साधून घटना कळवली, पोलीसही त्वरित घटनास्थळी धावले. त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली; पण चोरीचा कोठेही प्रकार दिसला नाही. यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली.
काही वेळात संबंधित वृध्द दाम्पत्य फिरून आले, गर्दी पाहून ते आवकच झाले. दाम्पत्याने साहित्य तपासले असता ड्राव्हरमधील एक हजार रुपये चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच महिन्यापूर्वी घरातील दोन लाख रुपये, तर पंधरा दिवसांपूर्वी ५० हजार रुपये चोरीला गेल्याचा दावा दाम्पत्याने करून आम्ही दुपारी फिरायला गेल्यानंतरच संबंधित चोरटा चोरी करून जातो, त्यामुळे त्याच्याकडे घराच्या कुलुपाची बनावट चावी असावी, असा संशय पोलिसांकडे व्यक्त केला; पण त्याबाबत दाम्पत्याने रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलिसांत कोणतीही तक्रार दिली नव्हती.