कोल्हापूर : ताराबाई रोडवरील सराफ पेढी फोडून चोरट्यांनी साठ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चौदा लाख असा सुमारे ३५ लाख किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. वीस ते बावीस वर्षांचे दोघे चोरटे तोंडाला स्कार्प बांधून आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत दिसत आहे. ताराबाई रोडवर श्री साई मित्र मंडळाशेजारी सराफ कारागीर किरण हिरासो झाड (रा. पिनाक अपार्टमेंट, रंकाळा परिसर) यांची दोन मजली सराफ पेढी आहे. किरण झाड हे शुक्रवारी बेळगावहून गोव्याला गेले होते. रात्री सातच्या सुमारास मुलगा पीयूष हा दुकान बंद करून घरी गेला. या ठिकाणी पुतण्या रोहन हा झोपण्यास येतो. तो जेवण करून साडेदहाच्या सुमारास पेढीवर आला असता इमारतीचा मुख्य लाकडी दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे तो शेजारी सुनील मिस्कील यांच्या बंगल्याच्या गॅलरीतून दुकानाच्या गॅलरीत आला. तेथून आतमध्ये येऊन पाहिले असता पहिल्या मजल्यावरील काचेचा दरवाजा फोडलेला तसेच कपाट उघडलेले दिसले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने झाड यांना फोनवरून कळविले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मुलगा पीयूष दुकानात आला. त्याने जुना राजवाडा पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहिले. दुकानात चार-पाच सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यांचे फुटेज पाहिले असता दोन चोरटे चोरी करताना आढळले. कपाटातील रोख रक्कम चौदा लाख व साठ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)अशी केली चोरीशुक्रवारी रात्री नऊपासून दोघे चोरटे तोंडाला स्कार्प बांधून दुकानाच्या अवती-भोवती फिरत होते. आजूबाजूला कानोसा घेत त्यांनी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी दुकानाचा लाकडी दरवाजा उघडून आतील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडले. तेथून ते जिन्यावरून वरती पहिल्या मजल्यावर गेले. या ठिकाणी कॅश कॉउंटरमध्ये त्यांना कपाटाच्या चाव्या मिळाल्या. त्यांनी कपाट उघडून आतील रोकड व दागिने घेतले. त्यानंतर दहा वाजून सात मिनिटांनी ते पाठीमागील दरवाजातून बाहेर निघून गेले. जाताना दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे लक्षात येताच त्यांनी एक कॅमेरा फोडला. पाळत ठेवून चोरी चोरटे हे माहीतगार आहेत. सराफ पेढीच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेर कडी असते हे त्यांना माहीत होते. ताराबाई रोडवर रात्री साडेअकरापर्यंत नागरिकांची वर्दळ असते. सराफ पेढीच्या शेजारी घरे आहेत. समोर दुकाने व हॉटेल आहे. काही बँकांचे एटीएम सेंटर आहेत.
ताराबाई रोडवरील सराफ पेढीत चोरी
By admin | Published: March 11, 2017 11:56 PM