कोल्हापूर : येथील मंगळवार पेठेतील बजापराव माने तालीम, नंगीवली चौक, टिंबर मार्केट कमान परिसरातील रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या सुमारे १० रिक्षांची एकूण १२ चाके अज्ञात चोरट्यांनी काढून नेल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. एका रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणावर घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, मंगळवार पेठेत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास बजापराव माने तालीम, नंगीवाले चौक व टिंबर मार्केटची कमान या परिसरात रस्त्याकडेला उभ्या केलेल्या सुमारे १० रिक्षांची एकूण १२ चाके काढून चोरून नेण्याच्या घटना घडल्या. चोरट्यांची रात्रीच्या वेळी रिक्षाच्या चाकांखाली दगड, विटा लावून रिक्षाला आधार देऊन ही चाके निखळून काढली. त्यानंतर ती चोरून नेली. एका रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणात घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ वाढली आहे. सोमवारी (दि. ३०) रात्री उशिरा नंगीवाली चौक परिसरातून एक रिक्षा चोरीला गेली होती. दुसऱ्या दिवशी हा चोरीचा प्रकार उघड झाला होता; पण त्याच रिक्षातील पेट्रोल संपल्याने ही रिक्षा चोरट्यांनी उजळाईवाडीनजीक रस्त्यावर सोडल्याचे आढळले होते. सहा महिन्यांपूर्वी एकाच रात्रीत सुमारे १०० हून अधिक घरगुती पाण्याची मीटर चोरून नेण्याचा प्रकार गोखले कॉलेज ते पीटीएम परिसरात घडल्याची घटना ताजी असतानाच या चोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत संताप व्यक्त होत आहे. बिनकामाचा सीसीटीव्ही कॅमेरा शहर सुरक्षित राहावे यासाठी महानगरपालिका आणि कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले आहेत; पण या चोरीच्या पार्श्वभूमीवर नंगीवली चौक येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासले असता, हा कॅमेरा गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याचे आढळले आहे. त्रिमूर्ती कॉलनीत ७० लिटर दुधाची चोरी कळंबा गावानजीक कोल्हापूर शहराच्या उपनगरात त्रिमूर्ती कॉलनीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बरगे यांचे बाहेर नुकतेच गाडीतून उतरविलेले सुमारे ७० लिटर ‘गोकुळ’चे कॅरेटमधील दूध चोरून नेल्याची घटना घडली आहे. (प्रतिनिधी)
रात्रीत दहा रिक्षांच्या चाकांची चोरी
By admin | Published: June 02, 2016 1:00 AM