कोल्हापूर : कारखान्यास ऊस उतरुन परत निघालेली ट्रॅक्टर-ट्रॉली अडवून ती चोरुन नेण्याचा प्रकार कोगे (ता. करवीर) धरणानजीक मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडला. चारचाकी वाहनातून आलेल्या पाच युवकांनी ट्रॅक्टरचालकास दमदाटी करून त्याला जबरदस्तीने धक्काबुक्की केल्याचाही प्रकार घडला. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात पाच युवकांवर गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मेघराज लक्ष्मण चौरे (वय ३०, रा. पाडळी, ता. करवीर. मूळ गाव-जिवाचीवाडी, ता. केज, जि. बीड ) हे ऊसतोडणी कामगार व ट्रॅक्टरचालक असून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी ट्रॅालीमध्ये भरलेला ऊस कुंभी-कासारी साखर कारखान्यात उतरला. त्यानंतर ते मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन घरी परतत होते, त्यावेळी कोगे धरणाच्या पुढे एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने पुढे आले, त्याने ते वाहन आडवे घालून ट्रॅक्टर थांबवला. त्या चारचाकी वाहनातून पाच युवक खाली उतरुन त्यांनी ट्रॅक्टरचालकाला दमदाटी करून त्याला खाली ओढून आपल्या चारचाकी वाहनात बसवले. त्यानंतर पुढे दोन किमी अंतरावर पुढे सोडले. त्यानंतर या पाचजणांनी तो ट्रॅक्टर-टॉली जबरदस्तीने चोरुन नेला. याबाबत ट्रॅक्टरचालक चौरे याने करवीर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी तक्रार नोंदवली आहे.