कोल्हापूर : करंजफेण (ता. पन्हाळा) येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरात घुसून हात बांधून, अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा बनाव करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केला. संशयित आरोपी तुळसाबाई आनंदा नायकवडे (वय ४०) असे तिचे नाव आहे. तिने घरातील धान्याच्या डब्यात लपवून ठेवलेले दागिने स्वत:हून काढून पोलिसांना दिले. पोलिसांनी सांगितले, करंजफेण येथे २२ आॅगस्ट रोजी तुळसाबाई नायकवडे ही एकटी घरी असल्याचे पाहून चोरट्यांनी घरात घुसून तिचे तोंड दाबून व हात बांधून अंगावरील सोन्याचे गंठण, नेकलेस, बोरमाळ असे सुमारे ६२ हजार रुपयांचे दागिने चोरून चोर पळून गेले होते. या प्रकरणी तिच्या पतीने पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार विशेष पथकाने अभिलेखावरील गुन्हेगारांकडे तसेच बातमीदारामार्फत माहिती घेतली असता कोणतीच माहिती हाती लागली नाही. त्यानंतर विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, रमेश खुणे, उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, सुशील वंजारी, सचिन पंडित, कॉन्स्टेबल सुरेश चव्हाण, संजय काशीद, अनिल ढवळे, वसंत पन्हाळकर, रूपाली देसाई, रूपाली यादव, आदींनी तिच्याकडे स्वतंत्रपणे चौकशी केली असता ती वेगवेगळी माहिती सांगत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तुळसाबाईला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने असा कोणताही प्रकार घडला नसून, चोरी झाल्याचा बनाव करून चोरीस गेलेले दागिने घरातील धान्याच्या डब्यात लपवून ठेवल्याचे सांगत तिने ते काढून दिले. चोरांच्या अफवांचा फायदा घेत संशयित तुळसाबाईने पतीला घरामध्ये जबरी चोरी झाल्याची खोटी माहिती देऊन दागिने लपविण्याचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)
चोरीचा बनाव; महिलेस अटक
By admin | Published: September 13, 2015 12:21 AM