कोल्हापूर : घरचे अठराविश्वे दारिद्र्य, दोनवेळच्या जेवणाची भ्रांत, अशा परिस्थितीत शाळा-कॉलेजचे शिक्षण म्हणजे अनाठायी खर्च असल्याचा समज करून घेतलेले पालक, अशा परिस्थितीत जिद्दीने पहाटे उठून पेपर टाकणे, दूध पोहोचविणे किंवा गाड्या धुऊन त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यातून ज्ञानाची भूक भागवत अभ्यास करणाऱ्या मुलांची शिक्षणासाठी धडपड सुरू आहे. घरच्या जेमतेम परिस्थितीमुळे घरखर्चाला हातभार लावण्यासाठी ही मुले गाड्या धुण्यापासून, हॉटेलमध्ये वेटर म्हणून किंवा कापड दुकानांमध्ये सेल्समन म्हणून काम करीत असतात. मिळेल ते काम करून ती उदरनिर्वाह करीत आहेत. हलाखीच्या परिस्थितीमुळे काम करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नाही. उमलत्या वयात ती घामाच्या धारांत न्हाऊन जातात. काही मुले शाळा-कॉलेजमध्ये जाऊन उरलेल्या वेळेत अभ्यास आणि काम करतात. शिक्षणाचे महत्त्व असलेल्या या युगात पुढे जाण्यासाठी ही मुले कष्टाचे काम करीत आहेत. (प्रतिनिधी)सुट्यांचा असाही उपयोगउन्हाळ््याच्या सुट्या संपत आल्या असून, नवीन शैक्षणिक सत्रास सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांचे पालक महागड्या शैक्षणिक साहित्य खरेदीच्या विवंचनेत सापडले आहेत. अशावेळी अनेक मुले अर्धवेळ काम करून घरखर्चाला हातभार लावीत आहेत. काहींनी उन्हाळ््याच्या सुटीत लग्नसोहळ्यात वाढपी म्हणून काम करून पैसा जोडल्याने त्यांची शैक्षणिक साहित्यखरेदी सुलभ झाली आहे. यातील एका मुलीने तर आपल्या कमाईतून घरखर्च सांभाळला आहे.शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्वकमाईचे महत्त्व कळले पाहिजे. कोणतेही काम दुय्यम नसते. अनेक मुले कामे करून शिक्षण घेतात. त्यांच्या अभ्यासात कामामुळे अडथळा होत नाही. गरजू विद्यार्थ्यांबरोबर सधन घरांतील मुलेही अशा कामांसाठी पुढे येतात. आमच्या शाळेतील जाई फाले ही विद्यार्र्थिनी शाळा सुटल्यानंतर फरशी पुसण्याचे काम करून घरच्यांना हातभार लावत आहे. - सुजय देसाई, शिक्षक, म. दुं. श्रेष्ठी समता हायस्कूल.
शिक्षणासाठी 'त्यांची' रोजच धडपड
By admin | Published: June 05, 2015 12:04 AM