कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी असल्याने, उपचारासाठी रुग्णांना दाखल न करुन घेणाऱ्या खासगी रुग्णालयांवर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत आयुक्त कारवाई करतील.
ग्रामीण भागात जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी असल्याने अशा रुग्णालयांवर तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक यांना कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
मागील काही दिवसात काही खासगी रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार दिल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून प्रसिध्द झाल्या आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासगी रुग्णालयांचे व्यवस्थापन अधिकारी, डॉक्टर्स यांची आज बैठक घेतली.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे आदी उपस्थित होते
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना दाखल करुन त्याच्यावर उपचार झाले पाहिजेत. त्यानंतर पुढे त्याला संदर्भीत करणे योग्य ठरेल. परंतु, असे न होता त्याला परत पाठविले जाते. हे अजिबात योग्य नाही. यापुढेही जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी सर्व रुग्णालयांनी घ्यावी.
कोव्हिड काळजी केंद्रात बीएचएमएस, बीएएमएस असणारे डॉक्टर्स रुग्णांना उपचार करत आहेत. असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, रुग्णाला दाखलच करुन घ्यायचे नाही हे धोरण योग्य नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना हाॕटेल विलगीकरण तसेच गृह विलगीकरणात पाठवून खरी गरज असणाऱ्या रुग्णांना खाट उपलब्ध करुन द्यावी. महापालिकेने रुग्णालयांवर अॕडमीशन इन्चार्ज म्हणून सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
रुग्णालयात कुणाला दाखल केले जाते, कुणाला डिस्चार्ज दिला जातो, याची नोंद त्यांनी ठेवावी.प्रत्येक रुग्णालयासाठी रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट किट पुरविले जाईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
वैद्यकीय असोसिशनच्यामार्फत सध्याची परिस्थिती कशी हाताळायची, याबाबत प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव तपासून आवश्यकता भासल्यास काही रुग्णालये कोव्हीडसाठी घेण्यात येतील
महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, रुग्णाला दाखल करुन त्याच्यावर उपचार करुन चांगला संदेश समाजासमोर द्या. तुमच्या काही अडचणी असतील तर त्या मला वैयक्तीक रित्या कळवा.
गृह विलगीकरणातील रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबतही माहिती द्यावी. जिल्ह्यात एकही मृत्यू होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करुया. ज्या रुग्णालयांना लॉगिन दिले त्यांनी त्यावर उपलब्ध खाटा संदर्भात पारदर्शकपणे माहिती भरावी. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून रुग्ण सेवा द्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे म्हणाले, 21 मे 2020 च्या परिपत्रकाची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर उपचार व्हायला हवेत. उपचार करण्यास नकार देवू नये. त्याचबरोबर शासकीय दरानुसार रुग्णांच्या उपचाराचे बील घ्यावे, असेही ते म्हणाले.
डॉ. साईप्रसाद, डॉ. विजय हिराणी, डॉ. सुहास पाटील, डॉ. चंद्रशेखर देसाई, डॉ. अभ्यंकर, डॉ. गीता पिल्लई आदीनी सहभाग घेतला