कोल्हापूर : सीपीआर इमारतीचे भूमीपूजन व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारतीच्या उदघाटनासाठी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात येणार आहेत. पण, त्यासाठी त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सीपीआरच्या नवीन इमारत परिसरात किमान दहा हजार झाडे लावण्याची अट घातली आहे. याबाबत, दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामती येथे झालेल्या जनसन्मान मेळाव्यात सांगितले.कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल होणार आहे. या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या शाहूपुरी येथील नवीन इमारतीचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उदघाटन करणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यापुर्वी जाहीर केले होते.त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत मंत्री मुश्रीफ यांनी केंद्रीय मंत्री शाह यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कोल्हापूरला येण्याचे त्यांनी निमंत्रण स्विकारले, पण तत्पुर्वी दहा हजार झाडे लावण्याची अट घातली आहे.
..मगच कोल्हापूरला येतो, अमित शाह यांनी हसन मुश्रीफ यांना घातली अट
By राजाराम लोंढे | Published: July 15, 2024 4:55 PM