कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यात गेल्या काही दिवसापासून भ्रष्टाचार प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. यातच ईडीने मुश्रीफांच्या घरी छापेमारी करुन तपासणी केली. यानंतर काही दिवसातच मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेतही ईडीने छापा टाकत काही अधिकाऱ्यांना ताब्यात घेवून तपासणीनंतर सोडून दिले. दरम्यानच, सोमय्यांनी मुश्रीफांवर पुन्हा बँकेतून ४० कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप केला. या आरोपांना हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले. माझ्या बदनामीसाठी षड्यंत्र रचले जात असून यामागचा बोलवता धनी लवकरच उघड करू, अशा इशाराही दिला. सोमय्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे संचालकांना पाठवणार असल्याचेही ते म्हणाले.मी ठरवल्यास १०० कोटी जमवू शकतोमुश्रीफ म्हणाले, सोमय्यांकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत त्याचा मी निषेध करतो. त्यांनी केलेले आरोप आरोप निराधार आहेत. शेअर, तारणावर कर्ज घेतलं, नातेवाईकांना कर्ज दिलं हे आरोप खोटे आहे. आम्ही आवाहन केल्यानंतर पैसे गोळा झाले. मी ठरवल्यास १०० कोटी जमवू शकतो. मी कोणत्याही संकटाला पार करण्यास तयार आहे. शेतकऱ्यांकडून १० हजार आणि ५ राष्ट्रीयीकृत बँक कर्ज घेऊन माझ्या तीन मुलांनी कारखाना उभा केला. कोल्हापूर जिल्हा बँकेत कोणताही गैरव्यवहार झाला नसून बदनामीसाठी षडयंत्र सुरु असल्याचेही मुश्रीफ म्हणाले. सोमय्यांचा आरोप काय?किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राज्य सरकारकडून ३९ हजार शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम ठेव म्हणून ठेवली. त्या रकमेवर मुश्रीफ यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला ४० कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप केला आहे. तत्काळ विशेष लेखापरीक्षण करून संचालक मंडळ बरखास्त करावे व सहकार आयुक्तांनी या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी सोमय्या यांनी केली आहे.
..तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, किरीट सोमय्यांच्या आरोपांवर हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 4:17 PM