कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले असून त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच जनतेला महागाईचे तीव्र चटके बसत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. वेळीच योग्य निर्णय घेऊन अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न झाला नाही तर भारताची अवस्था शेजारच्या श्रीलंका देशासारखी होईल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.देशात आज कमालीची महागाई वाढली आहे. रोज पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती वाढत आहेत. सर्वसामान्य जनतेचे जगणे हैराण झाले आहे. मोदी सरकार विरोधात जनतेत कमालीचा रोष आहे. त्याकडे दुर्लक्ष होण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न चालविले आहेत. परंतु कोल्हापूरची स्वाभिमानी जनता पोट निवडणुकीत भाजपचा पराभव करुन तुमची धोरणे चुकत असल्याचा संदेश मोदींना दिला जाईल, असे चव्हाण म्हणाले.
महागाई वाढायला केंद्र सरकारची धोरणे आणि त्यांनी लावलेली एक्साईज ड्युटी कारणीभूत आहेत. गेल्या सात वर्षात मोदी सरकारने केवळ पेट्रोलियम पदार्थापासून कर रुपाने २४ लाख कोटी रुपये महसुल जनतेच्या खिशातून वसुल केला आहे. तो इतका यापूर्वी कोणत्याच सरकारने वसुल केला नव्हता, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
ईडीचा वापर ब्लॅकमेलींगसाठीकधी नव्हे इतका सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेलींग केले जात आहे. दहशतवादी गटांना अर्थसहाय्य करण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून ईडीचा कायदा काँग्रेस सरकारने केला. पण त्याचा काँग्रेस काळात केवळ ३० ते ४० केसीस दाखल झाल्या होत्या. मात्र मोदी सरकार त्याचा ब्लॅकमेलींगसाठी उपयोग करत आहे. कारवाई करा, पण ती सुडाच्या भावनेने करु नका. चौकशी करा पण ती शेवटपर्यंत न्या. एकाचीही सरळ चौकशी नाही. एकाही गुन्ह्यात कोणाला शिक्षा झाली नाही. आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना शरण आणण्यासाठीच त्याचा वापर केला जात आहे. असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
तर श्रीलंका होईल
मोदींनी नुकतीच केंद्रातील सचिवांची बैठक घेतली. या बैठकीत सचिवांनी मोदींना आपल्या धोरणात बदल केले नाहीत तर आपल्या देशाची अवस्था श्रीलंका असा इशाराच सचिवांनी दिला आहे. कोविडच्या आधी देशाचा विकास दर ४.२ इतका असल्याचे सांगितले गेले. परंतु तो मायनस होता. महागाई वाढल्याने अर्थव्यवस्थेला घरघर लागली असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.