पूरग्रस्त जनतेवर ज्या पालकमंत्र्यांमुळे शिमगा करण्याची वेळ आली, तेच आता आक्रोश मोर्चाची शिमगा अशी हेटाळणी करत आहेत. कधी हातात खुरपं, काटापारडे घेतलेले नाही, त्यांना पूरग्रस्तांचे दु:ख कसे कळणार? असा सवाल करून दु:खाची चेष्टा करणार असाल तर जनता तुमचा शिमगा केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. पूरग्रस्तांच्या संपूर्ण मागण्यांचा निर्णय घेतल्याशिवाय एकाही मंत्र्याला पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी बोलताना शेट्टी यांनी पूरग्रस्तांना दिल्या जाणारी तुटपुंजी मदत आणि पूरकाळात झालेल्या दुर्लक्षावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली. हातात वाळलेले ऊस घेऊन संपूर्ण कर्जमाफीची घोषणा देत दसरा चौकातून दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. स्टेशन रोड, असेंब्ली रोडमार्गे मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. पूरग्रस्त शेतकरी, व्यापारी, महिलांची संख्या मोठी होती.कोंबडीचोर कृषिराज्यमंत्री : शेट्टीकोंबडीचोर कृषिराज्यमंत्री, शेतीची माहिती नसणारे पालकमंत्री असे मंत्री ज्या सरकारमध्ये आहेत, त्यांच्याकडून काय आणि कुठल्या अपेक्षा करायच्या, असे सांगून राजू शेट्टी यांनी बिंदू चौकातील सभेला काही तुम्ही येत नाही, निदान तुम्हाला नेमकं कळतंय तरी कशातलं, तेवढं तरी आम्हाला सांगा. विद्यार्थी संघटनेचे नेते होता, तरी विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. नेमके कुठले प्रश्न सोडविले ते तरी जनतेसमोर उघड होऊ देत. तुमच्या भानगडी काढल्या तरी पळताभुई थोडी होईल, असा इशाराही पालकमंत्र्यांना दिला.
...तर जनताच तुमचा शिमगा करेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 1:01 AM