कोल्हापूर - माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापे टाकल्यानंतर ते का छापे पडले याबाबत वस्तुस्थिती न सांगता ते जातीचा आधार का घेत आहेत, अशी विचारणा शाहू सहकार समुहाचे प्रमुख समरजित घाटगे यांनी केली आहे. आपल्यावरील कारवाईमागे घाटगे असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर शनिवारी पत्रकार परिषदेत घाटगे यांनी प्रत्युत्तर दिले.
घाटगे म्हणाले, आतापर्यंत तीन वेळा मुश्रीफ यांच्यावर छापे पडले. तीनही वेळा त्यांचे तेच तेच आरोप असतात. हे छापे पडले तेव्हा मी दिल्लीत होतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी शाहू महाराजांचा वंशज आणि विक्रमसिंह घाटगे यांचा चिरंजीव आहे. मुश्रीफ यांच्यासारखा पाठीत खंजीर खुपसणारा नाही. जो वार करायचा तो समोरून करणारा आहे. मला किरीट सोमय्या यांच्या मागे लपायची गरज नाही. माझ्याकडेही अनेक गोष्टी आहेत. वेळ आल्यावर छाती ठोकून मी त्या जनतेसमोर आणणार आहे.
मुश्रीफ आणि मलिक यांचे काय संबंध
छापे पडल्यानंतर मुश्रीफ यांना जात आठवली. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर छापे पडले ते मुश्रीफ यांना आठवले नाही. परंतु, दहशतवादी कारवाया करणाऱ्यांशी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपावरून मलिक तुरूंगात होते. अशा मलिक यांची मात्र मुश्रीफ पाठराखण करतात. मग मुश्रीफ आणि मलिक यांचे नेमके काय संबंध आहेत हेदेखील आता तपासावे लागणार असल्याचे घाटगे म्हणाले.