कोल्हापूर: सत्ताधाऱ्यांकडे ठरावधारक संस्थांचे पॉकेट आहे, आम्ही गोकुळमध्ये कधीही सत्तेत नव्हतो, मग आता त्यांना टक्कर द्यायची तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला उभा करुन बळी द्यायचा का असा प्रतिप्रश्न ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विचारला. गोकुळसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये नेत्यांच्या वारसदारांचा भरणा जास्त असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, यावर मुश्रीफ यांनी बळी द्यायचाच तर आमच्याच पोरांचा देऊ असे सांगत यावर जास्त बोलण्यास नकार दिला.
जिल्हा बँकेत शुक्रवारी सकाळी ताळेबंद अंतिम झाल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार बैठकीत गोकुळच्या घडामोडीवरही चर्चा झाली. मुश्रीफ म्हणाले, गाेकुळ दूध संघ आम्हाला सत्तेसाठी नव्हे तर चांगला आणि शेतकऱ्यांच्या हिताचा पारदर्शी कारभार करण्यासाठी हवा आहे. आमचा हेतू चांगला असल्याने चांगले लोकही आकृष्ट झाले आहेत, ही संख्या वाढणारच आहे. लिटरमागे उत्पादकांना २ ते ४ रुपये दरवाढीसह अमूलच्या धर्तीवर गोकुळचा विकास करण्यासाठीच निवडणुकीत ताकदीने उतरलो आहोत.
उमेदवारी कुणाला अंतिम करायची ती छाननी झाल्यावरच निश्चित होणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान होतो, पण यावेळी निवडणूक अटीतटीची असल्यानेच ताकदीच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे, यात कुठेही कार्यकर्त्यांना डावलण्याचे धोरण नाही, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
चौकट ०१
शेट्टींचे, आवाडेंचेही स्वागतच
गोकुळमध्ये सत्ताधारी व विरोधी शाहू आघाडीबरोबरच तिसऱ्या आघाडीचाही पर्याय आमदार प्रकाश आवाडे यांना दिल्याच्या विचारलेल्या प्रश्नावर त्यांचे स्वागतच आहे, त्यांना शुभेच्छा आहेत, अशी मिश्कील टिप्पणी केली. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही १० लिटर दूध काढण्याची घातलेली अट ही स्वागतार्ह असल्याचे सांगितले.
चौकट ०२
योग्य कार्यकर्त्याला संधी
राष्ट्रवादीच्या आजी-माजी जिल्हाध्यक्षांनी एकाच तालुक्यात उमेदवारी अर्ज भरल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर योग्य वेळी योग्य कार्यकर्त्याला संधी दिली जाईल अशी गुगली मुश्रीफ यांनी टाकली. त्यामुळे ए.वाय. पाटील आणि के.पी.पाटील यांचा मुलगा यांच्यात योग्य कोण याची चर्चा सुरु झाली आहे.