इचलकरंजी : हार्वेस्टर मशीनने तोडलेल्या उसाची मोळी बांधणीचा दर एक टक्का करावा, यासंबंधी गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. मात्र, बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे साखर आयुक्तांचे सोमवारी (दि.२२) जे काही आदेश येतील. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगितले. तर आंदोलन अंकुश व जय शिवराय किसान संघटनेने सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास ऊस तोडणी बंद पाडण्याचा व आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. त्यामुळे या निर्णयाकडे साखर कारखानदार व संघटनांचे लक्ष लागून राहिले आहे.मशीन तोडसाठी उसाची पाच टक्के कपात अन्यायकारक असून, ती एक टक्के करावी, या मागणीसाठी आंदोलन अंकुश व जय शिवराय किसान संघटना यांनी आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांचे प्रबोधन, ऊसतोडणी बंद, उपोषण या मार्गे आंदोलन सुरू आहे. मात्र, साखर कारखानदार याला न जुमानता तोडणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेतली. तब्बल दीड तास चाललेल्या चर्चेतून ठोस निर्णय होऊ शकला नाही. परंतु प्रांताधिकारी खरात यांनी साखर आयुक्तांकडून आदेश मागवून त्याचे पत्र सोमवारी आंदोलकांना देणार असल्याचे सांगितले.यावेळी पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, जयसिंगपूरचे उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, हातकणंगलेच्या तहसीलदार कल्पना ढवळे, शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, अप्पर तहसीलदार शरद पाटील, कारखान्याचे प्रतिनिधी किरण कांबळे, उदय पाटील, सर्जेराव वावरे, सी.एस. पाटील यांच्यासह संघटनेचे सदाशिव कुलकर्णी, गब्बर पाटील, शीतल कांबळे, आदी उपस्थित होते.
..तर ऊस तोडणी बंद पाडणार; शेतकरी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 6:41 PM