सांगली : समाजातील अंधश्रद्धा चाकोरीबद्ध आणि नव्या विचारांना विरोध करणाऱ्या धर्मामधूनच निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मानवी जीवन विज्ञाननिष्ठ व सत्याचा आग्रह धरणारे बनवायचे असेल, तर धर्माची चिकित्सा करणे गरजेचे आहे. तारतम्यावर आधारलेली व कोणाचीही भीती न बाळगता केलेली धर्मचिकित्सा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी शनिवारी व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या वार्तापत्राच्या रौप्यमहोत्सवानिमित्त सांगली येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सभागृहात आयोजित दुसऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. साळुंखे बोलत होते. ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. साळुंखे म्हणाले की, लोकांच्या जीवनाला अंधश्रद्धा चिकटून बसल्या आहेत. त्या दूर झाल्या तरच जीवन सुसह्य होणार आहे. अज्ञानावर आधारलेल्या, अन्यायी आणि भेदभाव निर्माण करणाऱ्या गोष्टींना न घाबरता दूर सारण्याची आज गरज आहे. संतुलित विचारांची पिढी घडवायची असेल, तर याला विरोध केला पाहिजे. यासाठी धर्मचिकित्सा करत चांगल्या-वाईटाचा, खऱ्या-खोट्याचा योग्य निवाडा केला पाहिजे. अंधश्रद्धेचा विचार प्राचीन व भारतीय असल्याचे सांगत डॉ. साळुंखे म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार पाश्चात्त्यांकडून आयात केलेला परकीय, उपरा आणि भारतीय संस्कृतीला छेद देणारा असल्याचा अपप्रचार होत आहे. समाजात आजही अनेक अंधश्रद्धा अस्तित्वात आहेत. अशा स्थितीत गौतम बुद्धांनी त्याकाळात घेतलेली बौद्धिक झेप थक्क करणारी असून, त्यांनी जो उपदेश दिला, तो आजही निर्दोष आहे. त्यात बदलही अपेक्षित वाटत नाही. ही बाब बुद्धांच्या गौरवांची मानायची की आपल्या बौद्धिक लाघवीची मानायची? उद्घाटक आणि ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षांत प्रश्नहीन समाजाची निर्मिती झाली असून, या काळात लोकशाहीच्या मूल्यांची घसरण होत आहे. यात मानवतावादी तत्त्वांनाही समाजातून वेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी मूठमाती दिली आहे. देशात वैज्ञानिक दृष्टिकोन आल्यास मजबूत लोकशाही निर्माण होण्यास मदत होईल. जगभर भाषा मरत चालली असून, चिन्हांची नवी भाषा उदयास येत आहे. नव्या समाजाची कल्पना करताना समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या विचारांपासून दूर जाऊन चालणार नाही. नव्या विचारांना सामोरे जाण्यापेक्षा त्याला विरोध करण्यातच आपण धन्यता मानत बसत असतो. त्यामुळे पुरोगामी विचार ही केवळ एक कविकल्पना व स्वप्नच ठरत आहे. चळवळीसमोरील आव्हानांबाबत ते म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर चळवळीस नवी आव्हाने स्वीकारावी लागणार आहेत. देशातील लोकशाही टिकविणे गरजेचे असून, विचार मेला तर लोकशाही मरेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकविताना सहिष्णुताही आवश्यक आहे. जो विरोधी विचार दडपण्याचा प्रयत्न करतो, तो विवेकी असूच शकत नाही. नव्या समाजातील विचारांची निर्मिती करताना देश, जात, धर्म, सांस्कृतिक सवयी या पलीकडचा समाज निर्माण व्हायला हवा. स्वागताध्यक्ष अॅड. के. डी. शिंदे म्हणाले की, संमेलनांच्या हिशेबातील भांडणाने साहित्य संमेलने गाजत असताना, एकच विचार घेऊन होत असलेले अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन लक्षवेधी आहे. विवेकाची चळवळ पुढे नेणारे, वैचारिक प्रबोधन करणारे हे संमेलन आहे. ‘अंनिस’बाबत समाजात समज कमी आणि गैरसमज जास्त असल्याने चळवळीची विज्ञाननिष्ठ भूमिका जनमानसासमोर मांडण्यासाठी संमेलन उपयुक्त आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक प्रा. प. रा. आर्डे यांनी प्रास्ताविक केले. गणेश देवी यांचा परिचय डॉ. हमीद दाभोलकर यांनी करून दिला. संमेलनाचे पहिले अध्यक्ष उत्तम कांबळे अनुपस्थित असल्याने त्यांचा संदेश कृष्णा चांदगुडे यांनी वाचून दाखविला. यावेळी ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, अंनिसच्या राज्य उपाध्यक्षा तारा भवाळकर, मुक्ता दाभोलकर, राजा शिरगुप्पे, माधव बागवे, सुशीला मुंडे, राहुल थोरात, राजीव देशपांडे, उमेश सूर्यवंशी, धनाजी गुरव, सत्यपाल महाराज, प्रभाकर नानावटी, आदी उपस्थित होते. विचार जागरातून अनेकांना उभारी गेल्या पन्नास वर्षांत देशात अनेक बदल झाले आहेत. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशात समाजविघातक विचार जन्माला येत आहेत. समाज परिवर्तनाच्या बाबतीत कधी कधी निष्ठा चुकीची सवय बनत गेली आहे. यामुळे पन्नास वर्षांतील माझ्या विचारशील स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. स्वप्ने तुटून गेली आहेत; पण या विचार जागरातून माझ्यासह अनेकांच्या विचारांना उभारी मिळणार असल्याची भावूक प्रतिक्रिया गणेश देवी यांनी व्यक्त केली. मस्के यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जिल्ह्यातील ‘अंनिस’चे पूर्णवेळ कार्यकर्ते असलेले राजाराम मस्के यांचे नुकतेच निधन झाले आहे. ग्रामीण व विनोदी ढंगातून गावोगावी फिरून प्रबोधन करणाऱ्या मस्के यांचे नाव संमेलनस्थळी भोजनगृहाला देण्यात आले आहे. शनिवारी संमेलनात त्यांच्या कुटुंबीयांना ‘अंनिस’तर्फे आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. विचारात लवचिकता आवश्यक कार्यकर्ते कुणाच्याही घरी गेले की त्या घरातील भिंती तपासू लागतात. भिंतीवर कोणाची छायाचित्रे आहेत, कोणाची नाहीत, याची परीक्षा घेऊ लागतात. देवता आहेत का, देव्हारा आहे का, याची तपासणी करतात. सहकाऱ्याला उपदेश देत त्याच्या चुका व उणिवा मांडतात. याच न्यायाधीश पदातून कार्यकर्त्यांनी बाहेर पडले पाहिजे. आपल्या विचारात लवचिकता आवश्यक असून, कोणाच्याही घरी मित्रत्वाच्या नात्याने जाऊन चळवळीत एखाद्या कार्यकर्त्याची भरच घालावी, असे आवाहन करत, नाती तुटणारी चळवळ काय कामाची? असा प्रश्नही संमेलनाध्यक्ष साळुंखे यांनी उपस्थित केला. विकास खुंटविणारे तण रोखा शेतकऱ्याला पीक हवे असते, तरीही त्यात तण आपोआप उगवते. पिकाला रोखून धरणारे, अन्नरस शोषून घेणारे, वाढ खुंटविणारे हे तण पिकापुढे आव्हान निर्माण करते. अगदी तसेच विज्ञानवादी, विवेकाचा आग्रह धरणारे मानवी जीवन अपेक्षित असताना, अंधश्रद्धारूपी तण प्रेरणादायी, विकासवादी पिकाला आव्हान निर्माण करीत असते. प्रत्येकाने प्रयत्न करीत हे विकास खुंटविणारे तण वाढू न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. साळुंखे यांनी केले. प्रश्नहीन समाज निर्माण होण्याचा धोका देशात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी व लोकशाही रुजविण्यासाठी चळवळ निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर अविवेकशील, स्वार्थी लोकांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे लोकशाहीचा आत्मा धोक्यात येतो आहे की काय, अशी भीती आहे. यामुळेच भविष्यात एक हुकूमशाही आणि प्रश्नहीन समाज निर्माण होण्याचा धोका असल्याची चिंता गणेश देवी यांनी व्यक्त केली.
धर्मचिकित्सा आवश्यक
By admin | Published: May 14, 2016 11:51 PM