शिरढोण (ता. शिरोळ) येथे एक एकर शेतीतून नऊ टन झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेतले. सेंद्रिय शेतीमुळे तब्बल तीन महिने झेंडूचे उत्पादन घेता आले. यंदा झेंडूला दर नसतानाही मंदीच्या काळातही खर्च वजा जाता एक लाखाचे उत्पादन मिळाले. लेथ व्यवसायात मंदीचे दिवस आल्याने तरुण उद्योजक संजय बाबू पाणदारे यांनी शेत शाश्वत ठेवून घेतलेले उत्पादन आदर्शवत आहे.पाणदारे यांची तीन एकर शेती असून, त्यांचे इचलकरंजी शहरात लेथ मशीन आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करत आपल्या व्यवसायाकडेच त्यांचे अधिक लक्ष होते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून जागतिक मंदीचे सावट पडल्याने त्याचा परिणाम या नवउद्योजक तरुणावरही पडला. त्यामुळे या व्यवसायाकडे लक्ष कमी करून ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणून ते शेतीकडे वळले आहेत.शेतीमध्ये केवळ रासायनिक खतांचा मारा करून शेती संपविण्यापेक्षा शेती शाश्वत ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा त्यांनी संकल्प केला. केवळ ऊस पिकावरच अवलंबून चालणार नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक शेतीतून सोनं पिकविण्याचा निर्धार त्यांनी केला. दोन एकर शेती ठिबक केली असून, त्यावर ते केळीचे उत्पादन घेत आहे.मुबलक पाणी, आधुनिक तंत्रज्ञान, योग्य वातावरण, निचरा शेती असल्याने झेंडूच्या फुलांचे पीक घेण्याचा निश्चय त्यांनी केला. एक एकर क्षेत्रावर २१ आॅगस्ट २०१४ रोजी त्यांनी कलकत्ता गोल्ड जातीची सहा हजार रोपे लावली. त्याला ठिबक करून शेतीला रासायनिक खतांची सवय झाल्याने एकदम रासायनिक खत बंद करण्यापेक्षा पन्नास टक्के रासायनिक खते वापरून उर्वरित सेंद्रिय पद्धतीवर भर दिला.नोव्हेंबरमध्ये फूल तोडणी चालू झाली. वास्तविक फूल चालू झाले की दीड ते जास्तीत जास्त दोन महिने फुलांचे उत्पादन निघते. मात्र, शेतीमध्ये दर पंधरा दिवसांतून ठिबकद्वारे जिवामृत सोडले जात असल्याने व औषधांऐवजी गोमूत्राची फवारणी घेतल्याने तीन महिने झाले तरी अद्यापही फूलकळी वाढतच आहे. एक एकर शेतीसाठी ७० हजार रुपये खर्च आला आहे. नऊ टन फुलांचे उत्पादन निघाले असून बाजारात फुलाला सरासरी २५ ते ३० रुपयेच दर मिळाला. या दरातही उत्पादन जास्त निघाल्याने खर्च वजा जाता एक लाख रुपये नफा मिळाला. शेतीतून चिकाटीने सोने पिकविणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा आदर्श घेण्यासारखा आहे.
शिरढोणमध्ये एकरात नऊ टन झेंडू
By admin | Published: February 16, 2016 12:44 AM