कोल्हापूर : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच्या आणि राज्यातील बुलढाणा, अमरावतीसह चार जिल्ह्यांत संचारबंदी लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधाच्या नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश काढले आहेत. यावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोणतेही नवे निर्बंध न लावता, आहेत त्याच जुन्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रसंगी दंडात्मक कारवाई करा; पण हयगय नको, असे बजावल्याने यंत्रणा गतिमान झाली आहे.
मुख्यमंत्र्यांसमवेत व्हीसीद्वारे राज्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (दि. १६) झाल्यानंतर बुधवारी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना प्रतिबंधक आदेशाच्या अंमलबजावणीचे परिपत्रक काढले आहे. ‘मिशन बिगिन’ अंतर्गत जे नियम लावले होते, त्यांचीच अंमलबजावणी पुन्हा एकदा करण्यात येणार आहे. त्याची प्रत गुरुवारी जिल्हाधिकारी, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस विभाग यांच्या हातात पडल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनासाठीची यंत्रणा गतिमान करण्यास सुरुवात झाली आहे.
पुन्हा टाळेबंदी करण्याची वेळ येऊ नये असे वर्तन सार्वजनिक आणि वैयक्तिक पातळीवर ठेवावे, असे सांगताना कोरोनाची परिस्थिती गंभीर रूप धारण करील हे गृहीत धरूनच प्रशासकीय यंत्रणांनी कामाला लागावे, असे आयुक्त राव यांनी आदेशात म्हटले आहे. मास्क वापराची सक्ती करतानाच सॅनिटायझर, साबणाने हात धुणे, साेशल डिस्टन्स ठेवणे हे पाळावेच लागणार आहेत. यात हयगय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
चौकट ०१
हे नियम पाळावेच लागणार
१. कार्यालयात व बाहेर फिरताना मास्क वापरणे बंधनकारक.
२. सरकारी कार्यालयातील उपस्थिती व खबरदारीच्या उपाययोजना यांचा विसर नको.
३. मंगल कार्यालये, सांस्कृतिक सभागृह, उद्यान, स्टेडियम येथे पथकांद्वारे तपासणी.
४. राजकीय सभा, मोर्चे, मिरवणुका, लग्नसमारंभ येथे १०० लोकांचीच उपस्थिती ठेवा.
५. हॉटेल, रेस्टॉरंट, उपाहारगृहात मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचा अवलंब आवश्यक.
६. कोचिंग क्लासेसमध्येही मास्क व सोशल डिस्टन्स बंधनकारक.
७. खासगी दवाखान्यांतील सर्दी, तापाच्या रुग्णांना कोविड टेस्ट बंधनकारक.
८. महापालिका, नगरपालिकांनी कंटेन्मेंट झोन निश्चित करावेत.
९) वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोविड केअर सेंटर सुसज्ज ठेवा.
१०) सुपर स्प्रेडर राेखण्यावर भर द्यावा.